तापाच्या साथीचा संगमेश्‍वरात तिसरा बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

देवरुख -  तापाच्या साथीत तिसरा विद्यार्थीही बळी पडला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १६० तापाचे रुग्ण सापडले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

देवरुख -  अचानक सुरू झालेल्या तापाच्या साथीत तिसरा विद्यार्थीही बळी पडला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १६० तापाचे रुग्ण सापडले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

संगमेश्वर तालुक्‍यात तापसरीने धुमाकूळ घातला आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयातही तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे; मात्र या साथीकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. गेल्या तीन दिवसांत तुषार पातेरे (१८, रा. साडवली), ऋषीकेश दामुष्टे (१७, रा. मुरादपूर), मृणाली सावंत (१२, रा. देवरूख) यांचा बळी गेला. यातील तुषार हा बुरंबी येथील महाविद्यालयात, ऋषीकेश देवरूख महाविद्यालयात, तर मृणाली पाध्ये इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. केवळ एक-दोन दिवस आलेल्या तापाने त्यांच्यावर घाला घातला.

हे प्रकार घडल्यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. एक आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यातून दोन दिवसांत तालुक्‍यात तापाचे १६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्याचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी पी. एस. ठोंबरे यांनी आज देवरूखला भेट दिली. तालुका आरोग्य विभागातून साथीचा आढावा घेतला. तालुका आरोग्य अधिकारी व्ही. आर. रायभोळे यांनी त्यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर ठोंबरे यांनी देवरूख ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत विचारणा केली, तेव्हा उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तापाच्या रुग्णांची संख्या १०८ पेक्षा जास्त असण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या सर्व जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यावरच हा ताप कसला, त्याचे निदान होईल. तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

माचिवले यांचे क्षयरोगाने निधन
संगमेश्‍वर तालुक्‍यातील घाटिवळे गावात राहणाऱ्या शेखर गजानन माचिवले (वय ३३) या तरुणाचे क्षयरोगाने निधन झाले. देवरूख पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. तो मूळचा ओरीतील आहे. कामानिमित्त कुटुंबासह घाटिवळे येथे राहत होता. तेथे त्याला रक्‍ताची उलटी झाली. त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: ratnagiri news third victim of fever in sangmeshwar