खेड तालुक्यातील जंगल तोड लोकप्रतिनिधींशी संबंधित? 

सिद्धेश परशेट्ये
रविवार, 15 एप्रिल 2018

खेड - तालुक्यातील रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या संरक्षित वनक्षेत्राच्या लगत असलेल्या खासगी क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बेसुमार जंगलतोडीची दखल वन विभागाने घेतली आहे. तत्काळ मोबाईल स्कॉड घटनास्थळी पाठवण्यात येणार आहे.

खेड - तालुक्यातील रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या संरक्षित वनक्षेत्राच्या लगत असलेल्या खासगी क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बेसुमार जंगलतोडीची दखल वन विभागाने घेतली आहे. तत्काळ मोबाईल स्कॉड घटनास्थळी पाठवण्यात येणार आहे. पण घटनास्थळी गेल्याचे भासवत येथील स्थानिक पथकाने जणू लाकूडतोड्यांना अभयच दिले. वनाधिकार्‍यांच्या पथकाची पाठ फिरताच या परिसरात वृक्षतोड सुरूच आहे. जंगलतोडीशी स्थानिक लोकप्रतिनिधींचा संबंध आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 ही वृक्षतोड उत्तर प्रदेश आणि बिहार येथील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मोठमोठे वृक्ष अत्याधुनिक करवतीच्या सहय्याने तोडण्यात येत आहेत. तोड करणाऱ्या मजूरांनी वन खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दादही दिली नाही. पथक त्या ठिकाणी गेले त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडलेला लाकूड साठा ट्रकमधून दहागाव-मुगीजकडे नेण्याची धावपळ सुरू होती. वन विभागाचे पथक त्या ठिकाणाहून हात हलवत परत आले.

खेडचे वनाधिकारी एस. बी. मोहिते, वनरक्षक कर्मचारी एस. व्ही. धुंडगे, आर. आर. शिंदे व एम. बी. पाटील यांचे पथक रसाळगड परिसरात जंगलतोडीची पाहणी करण्यासाठी गेल्याचे समजताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांतच वन विभागाचे पथक घटनास्थळावरून परत येताना माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटले.

आता जंगलतोड थांबली आहे. तोडलेली लाकडेदेखील संबंधित भागात नाहीत. आम्ही याबाबतचा कारवाईचा अहवाल तयार करीत आहोत.

-  एस. बी. मोहिते, वनाधिकारी 

माध्यमांच्या प्रतिनिधींनी माहितीची खातरजमा केली असता जनरेटर लावून अत्याधुनिक करवतींनी वृक्षतोड सुरूच होती. वाहतुकीसाठी वाहनांसह सुमारे दहा ते पंधरा परप्रांतीय कामगार काम करताना दिसले. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने पाहणीचा केवळ फार्स केल्याचे उघड झाले.

या ठिकाणी स्थानिक कर्मचार्‍यांच्या पथकाला न पाठविता तत्काळ मोबाईल स्कॉड घटनास्थळी पाठवून आम्ही माहिती घेऊन या प्रकरणी योग्य ती कारवाई करू. 

- विकास जगताप, वरिष्ठ वनाधिकारी

राजकीय पुढार्‍याचे दडपण

जंगलतोड खासगी असली तरी  रसाळगडाच्या पायथ्याशी सुरू आहे. या तोडीवर कारवाई होणे आवश्यक आहे. जंगलतोडीशी स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित आहेत. त्यामुळे याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ सचिन शिंदे यांनी केला. 

Web Title: Ratnagiri News Tree cutting issue In Khed Taluka