नेव्हल युनिटकडील दोघा अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा

नेव्हल युनिटकडील दोघा अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा

रत्नागिरी - रत्नागिरी नेव्हल युनिटच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केला आहे. प्री-मेनू कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण व कॅम्प कालावधीत लोकसेवक म्हणून काम करण्याऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर केला. बोटीच्या व ट्रॅव्हल एजन्सीच्या खर्चाच्या खोट्या पावत्या वापरून अपहार केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या विभागाने पत्रकात म्हटले आहे की, विघ्नेश उंदिरे (तत्कालीन कमांडिंग ऑफिसर, २ महाराष्ट्र नेव्हल युनिट - एनसीसी रत्नागिरी आणि सध्या, कमांडर, सीनिअर स्टाफ ऑफिसर (ॲडमिन), हेडक्वॉर्टर्स, अंदमान अँड निकोबार कमांड) आणि आशीष कुमार (तत्कालीन लिडिंग स्टोअर्स असिस्टंट, २ महाराष्ट्र नेव्हल युनिट-एनसीसी रत्नागिरी, सध्या रा. नेव्ही ऑफिस पोर्ट कॉम्प्लेक्‍स, चेन्नई) अशी संशयित नौदल युनिट अधिकाऱ्यांची नावे आहेत.

हा प्रकार जुलै २०१५ ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी कार्यालय, रत्नागिरी येथे घडला. २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी - रत्नागिरी अधिकाऱ्यांविरुद्ध एनसीसी कॅम्पच्या अपहाराबाबत लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून लोकआयुक्त, मुंबई यांच्या आदेशावरून रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची चौकशी करण्यात आली. 

जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाच वेळा कॅम्पपूर्व समुद्री प्रशिक्षण व १८ ते २७ जानेवारी २०१६ या कालावधीत प्री-मेनू कॅम्प तसेच २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्री-मेनू कॅम्प आयोजित केले होते. या प्रशिक्षण व कॅम्प कालावधीत लोकसेवक म्हणून दोघे काम करीत होते.

बोटीच्या व ट्रॅव्हल एजन्सीच्या खर्चाच्या खोट्या पावत्या तयार केल्या. यातून ४ लाख ७६ हजार ९५० रकमेतून स्वतःचा आर्थिक फायदा करून शासकीय रकमेचा अपहार केला. गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश गुरव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) क सह १३ (२) तसेच भादंवि कलम ४६५, ४६७, ४६८,४०९,१०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बी. ए. तळेकर करीत आहेत. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com