सिद्धिविनायक ट्रस्टकडून डायलेसिस युनिट - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला डायलेसिसचे नवे युनिट आणि स्वतंत्र ॲरोप्लॅन्ट मंजूर झाला आहे. सुमारे ३६ लाख रुपये त्यासाठी मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी - सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला डायलेसिसचे नवे युनिट आणि स्वतंत्र ॲरोप्लॅन्ट मंजूर झाला आहे. सुमारे ३६ लाख रुपये त्यासाठी मंजूर झाले आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी १ कोटी रुपये देणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला आणखी ३० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. तसा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित होते. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची ट्रस्टवर नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यासाठी हा निधी आणण्यास सोपे गेले, असेही आमदारांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘सिद्धिविनायक ट्रस्टचे पूर्वीपासूनच सामाजिक क्षेत्रात भरीव काम आहे. शाळा, हॉल, वर्गखोल्या त्यांच्यामार्फत दिल्या जातात. या ट्रस्टवर शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्याशी चर्चा झाली. खासगी रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना डायलेसिस 
करणे परवडणारे नाही. त्यांची सोय होणे आवश्‍यक होते. हे ध्यानी घेऊन जिल्हा रुग्णालयाला ३२ लाखांचे डायलेसिसचे युनिट आणि ४ लाखाचे स्वतंत्र ॲरोप्लॅन्ट ट्रस्टने मंजूर केले. लवकरच ही रक्कम हाती येईल. ३० लाख रुपये अधिक निधी ट्रस्टने मंजूर केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असलेल्या सुविधांचा आराखडा तत्काळ देण्यात येणार आहे. ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो; परंतु त्याला बराच अवधी लागतो. अपेक्षित मदत रुग्णांना मिळत नाही. म्हणून ट्रस्टीने हमी दिल्यानतंर रुग्णाचे जे बिल होईल, त्यापैकी ट्रस्टकडून दिले जाणारे पैसे कमी केली जातील, अशा पद्धतीने व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

काही महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत व वाचनालयात वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर गोगटे-जोगळेकर आणि नवनिर्माण कॉलेजला ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. यामध्ये डाऊनलोड सिस्टीम नाही. शैक्षणिकदृष्ट्या आवश्‍यक बाबीच पाहता येणार आहेत; मात्र जो कोणी वायफाय वापरणार त्याचा नंबर तत्काळ सामंत यांना मिळणार. भविष्यात राजकीय फायदा मिळविण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे.

तारांगणचा प्रकल्प सहा कोटींचा
तारांगणला पुणे नगरविकास संचालकांनी मंजुरी दिली आहे. सुमारे ६ कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी २ कोटी निधी उपलब्ध असून उर्वरित ४ कोटी जिल्हा नियोजनमधून देण्याचा ठराव झाला आहे. ११ हजार स्क्वेअर फूटमध्ये हे तारांगण होणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ असे त्याचे नाव असेल. लवकरच त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती आमदार सामंत यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News Uday Samant press