वाशिष्ठी पूल धोकादायक, दुरूस्तीसाठी 3 कोटींची गरज - दलवाई

नागेश पाटील
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची दुरुस्ती गरजेची आहे. पुलाच्या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्काळ भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

चिपळूण - शंभरी ओलांडलेल्या बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलाच्या पिलरला धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटींची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे तीन वर्षापूर्वीच दुरुस्ती प्रस्ताव पाठवून देखील त्याची दखल घेतली नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची दुरुस्ती गरजेची आहे. पुलाच्या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्काळ भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर मुंबई - गोवा महामार्गावरील जुन्या पुलांचा प्रश्‍न निर्माण झाला होता. महाड येथील दुर्घटनेनंतर महामार्गावरील 14 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटींची आवश्यकता असल्याचे या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्र सरकारकडे पाठवले होते.

येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र दमडीचा निधीही मिळाला नाही. त्यामुळे आज खासदार हुसेन दलवाई  यांनी आज पुलाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार रमेश कदम,  माजी सभापती शौकत मुकादम व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, पोलिस व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. मुकादम यांनी पुलाच्या पिलरचे दगड निघत असल्याचे दाखवून दिले. या पिलरला संरक्षण कठडे उभारणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांनी सांगितले. पावसाळ्यात जोराचा पाऊस सुरू झाल्यास अवजड वाहतूक बंद ठेवावी लागते. पर्यायी असलेल्या पुलाचे काम देखील बंद आहे. पुलाची दुरुस्ती न झाल्यास त्यास केव्हाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी करणार असल्याचे खासदार दलवाई यांनी सांगितले. 

Web Title: Ratnagiri News Vashishti bridge dangerous