संगमेश्‍वरात भाजपची कसोटी

संगमेश्‍वरात भाजपची कसोटी

देवरूख - आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंची चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातून होणारी एंट्री सर्वांनाच धक्‍का देणारी आहे. मानेंच्या आगमनाने येथील विधानसभा निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या मुकाबल्यात भाजपची कसोटी लागणार आहे. 

२००९ मध्ये निर्माण झालेल्या चिपळूण मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राष्ट्रवादीची जागा आता भाजपने घेतली आहे. ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये गेल्या ३ वर्षांत या मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकही भाजप स्वबळावर लढणार हे निश्‍चित आहे. गतवेळी येथे नवखा उमेदवार असतानाही भाजपने लक्षणीय कामगिरी केली. या वेळी ती कसर भरून काढत भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंनी या मतदारसंघात एंट्री केली आहे. त्यांच्या वाढदिवस अभीष्ट चिंतनानिमित्त चिपळुणात झालेला कार्यक्रम हे त्यांच्या एंट्रीचीच झलक दाखवणारा ठरला आहे. 

२०१४ ला झालेले मतदान 

  •  सदानंद चव्हाण (शिवसेना)    ७५६९५

  •  शेखर निकम (राष्ट्रवादी)    ६९६२७

  •  माधव गवळी (भाजप)    ९१४३

  •  रश्‍मी कदम (काँग्रेस)    ३७०२

  •  गोपीनाथ झेपले (अपक्ष)    २७२०

  •  प्रेमदास गमरे - (बसपा)    १५९२

सद्यःस्थितीत बाळ माने दोन्ही तालुकाध्यक्षांसह संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत असून संपर्क वाढवत आहेत. याशिवाय संगमेश्‍वर तालुक्‍यातील रखडलेल्या विविध विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा सुरू केला असून देवरूख नगरपंचायत निवडणूकही प्रतिष्ठेची केली आहे. कुंडी, निवळी-नायरी घाटासह संगमेश्‍वर तालुक्‍यात रखडलेले दोन धरण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी त्यांनी कंबर कसली आहे.  
विद्यमान आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे. वरकरणी ही लढाई तिरंगी वाटत असली तरी ती भाजपसाठी काँटे की टक्‍कर ठरणार आहे. त्यामुळेच मानेंची येथील एंट्री राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. मानेंच्या एंट्रीने निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com