लोटेमध्ये रासायनिक सांडपाणी चेंबरमधून नाल्यात

प्रकाश भेकरे
बुधवार, 17 जानेवारी 2018

लोटे - लोटे औद्योगिक वसाहतीत सांडपाणी प्रकल्पासमोर मंगळवारी (ता. 16) सकाळी नऊ वाजता रासायनिक सांडपाण्याचा चेंबर भरून वाहू लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी नाल्यामार्गे वाहून गेले.

लोटे - लोटे औद्योगिक वसाहतीत सांडपाणी प्रकल्पासमोर मंगळवारी (ता. 16) सकाळी नऊ वाजता रासायनिक सांडपाण्याचा चेंबर भरून वाहू लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी नाल्यामार्गे वाहून गेले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सीईटीपीसह प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

लोटे वसाहतीतील कारखान्यातून रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये (रासायनिक सांडपाणी प्रकल्प) पाईपलाइनद्वारे आणले जाते. या सांडपाणी पाईपलाइनवर सांडपाण्याचे नमुने घेण्यासाठी चेंबर ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी सांडपाणी प्रकल्पासमोरील नाल्याच्या बाजूला असणारा जंक्‍शन चेंबर भरून वाहू लागला. हे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी सीईटीपीचे व्यवस्थापक फोजदार यांना विचारणा केली. रासायनिक सांडपाणी सोडण्यात येणारे सर्व व्हॉल्व बंद असतानाही चेंबर भरून वाहू लागल्याचे त्यांनी सांगितले.

8 जानेवारीला मासे मृत

लोटे वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर वारंवार सोडले जाते. 8 जानेवारीला आयनी खाडीमध्ये रासायनिक सांडपाण्यामुळे मासे मेले. रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्याविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

ग्रामस्थांनी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रवी आंधळे यांना घटनास्थळावर बोलावले. घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते यांनी रवी आंधळे यांना जाब विचारला, तेव्हा माझ्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. या प्रकाराचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे रवी आंधळे यांनी सांगितले.

लोटे उपसरपंच रवींद्र गोवळकर यांनी लोटे वसाहतीत रात्री होण्याऱ्या प्रदूषणाबद्दल श्री. आंधळे यांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले, गेले दोन दिवस प्रदूषण मंडळाचे अधिकारी लोटे वसाहतीमध्ये गस्त घालत आहेत. मात्र असे काहीही निदर्शनात आले नाही.

यावेळी घाणेखुंट सरपंच अंकुश काते, लोटे सरपंच आरती काते, उपसरपंच रवींद्र गोवळकर, भाजप तालुकाध्यक्ष विनोद चाळके, सुरेश कांबळे, प्रवीण काते, सचिन काते, मोहण वारणकर, संतोष ठसाळे, सुरेंद्र चाळके, प्रवीण चालके, समीर चाळके, किरण ठसाळे, संतोष ठसाळे, अविनाश चाळके, राकेश चाळके, अनंत काते, शेखर दिवेकर आदी  उपस्थित होते.

 

Web Title: Ratnagiri News water pollution issue in Lote MIDC