गणपतीपुळे विकास आराखड्यावर सोमवारी पुन्हा आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - लोकप्रतिनिधी, स्थानिकांना डावलून जिल्हा प्रशासनाने केलेल्या गणपतीपुळेच्या ८० कोटींच्या विकास आराखड्याची आमदार उदय सामंत यांनी आज चिरफाड केली. सर्वच अधिकारी तुकाराम मुंडे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जॅकेट घालून ‘ऐसा वैसा’ करून चालत नाही, असा शालजोडीतून टोलाही श्री. सामंत यांनी लगावला.

रत्नागिरी - लोकप्रतिनिधी, स्थानिकांना डावलून जिल्हा प्रशासनाने केलेल्या गणपतीपुळेच्या ८० कोटींच्या विकास आराखड्याची आमदार उदय सामंत यांनी आज चिरफाड केली. सर्वच अधिकारी तुकाराम मुंडे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जॅकेट घालून ‘ऐसा वैसा’ करून चालत नाही, असा शालजोडीतून टोलाही श्री. सामंत यांनी लगावला.

बैठकीत जे काही बदल सुचविले आहेत, ते चार दिवसांत आराखड्यामध्ये आले पाहिजेत. येत्या सोमवारी (ता. २६) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा आढावा बैठक होईल. ‘तीन वर्षांत जे झाले नाही, ते दहा दिवसांत मी करून दाखवतो,’ असे सांगत आमदार सामंत यांनी समाचार घेतला.

गणपतीपुळे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्नेहा सावंत, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती सौ. मेघना पाष्टे, गणपतीपुळे सरपंच श्री. ठावरे, सौ. साळवी, गजानन पाटील, प्रकाश साळवी, बांधकाम अधिकारी, प्राधिकरण, जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ८० कोटींच्या विकास आराखड्याची टिप्पणी घेऊन प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. 

श्री. सामंत म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाच्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा आहे. शासनाने ८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. या अनुषंगाने ही चर्चा आहे. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले असते, तर आराखड्यात एवढ्या त्रुटी निघाल्या नसत्या. रस्त्यांवर साधारण २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत; मात्र त्यांची लांबी कमी आहे. रस्त्याची चार कामे आहेत, त्यापैकी दोन जिल्हा परिषद आणि दोन सार्वजनिक बांधकामकडून करून घेतली जाणार आहेत. जिल्हा परिषद साडेपाच मीटरचे रस्ते, तर सार्वजनिक बांधकाम सात मीटरचे रस्ते करणार, हे काही कळले नाही.

गणपतीपुळ्याला पाणी देण्यासाठीची योजना देऊड गावच्या माथी मारली जात आहे. यापूर्वी नेवरे, धामणसेमधील ग्रामस्थांनी विरोध केला म्हणून पर्यायी गाव निवडले आहे. पाणीसाठा कमी आहे म्हणून नाही; त्यामुळे आराखड्यातील टिप्पणी चुकीची आहे. ती बदला.’’

श्री. सामंत यांनी सुनावले, ‘‘१ कोटी १४ लाख रुपयांत देऊड आणि चाफेच्या दोन योजना कशा होतील? एक विहीर खोदायची म्हणजे ४० ते ५० लाख रुपये जातात. त्यापेक्षा जिंदल कंपनीच्या पाणी योजनेतून संबंधित गावांना जोडणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. अधिकाऱ्यांनी स्थानिकांवर रोब दाखविण्यापेक्षा जिंदल कंपनीवर दाखवावा. स्थानिकांच्या विहिरी, कूपनलिका, टॅंकर टंचाईदरम्यान अधिग्रहण करण्याचे अधिकार आहेत. जिंदल कंपनीवर ते अधिकार गाजवून स्थानिकांना पाणी द्या. पाणी योजनेची जी रक्कम आहे, ती बावनदीतील धरणाची उंची वाढविण्यात वापरता येईल किंवा पुढील २५ वर्षांचा विचार करून देऊड, चाफेरी गावांना पाणी योजना द्याव्यात. त्यानंतर गणपतीपुळ्याला पाणी द्यावे. या पर्यायांचा विचार झालाच पाहिजे.’’

तीन एकरचे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये १३२ खातेदार आहेत. एकाही खातेदाराला याची माहिती नाही. सर्व खातेदारांचा याला विरोध आहे. त्यामुळे १ कोटी १३ लाखांच्या वाहनतळाचा हा विषय इथेच संपतो; मात्र, मध्यस्थाची भूमिका घेऊन सर्व खातेदारांना विश्‍वासात घेऊन त्यावर तोडगा काढू, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

एमटीडीसी अधिकाऱ्यांचीही फिरकी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचीही आमदार सामंत यांनी फिरकी घेतली. तालुक्‍यातील गावखडीमध्ये महामंडळाकडून रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबतच्या शासन आदेशाबाबत अधिकारी चव्हाण यांना विचारले असता त्यांनी थातुरमातुर उत्तर दिले. नेमकी योजना काय आहे, हे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तरुणांना रोजगार मिळावा, या उद्देशाने किनाऱ्यावरील सर्व बीचवर योजना राबविण्यात येणार आहे. थेट एमटीडीसी रिसॉर्ट उभे करणार नाही, याची माहिती घ्या, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Newsreview meeting on Ganapatipule development plan on Monday