Ratnagiri Palika Sabha | शहराच्या पाणीपुरवठ्यातील अनियमिततेवरून सभा गाजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी पालिका सभा

रत्नागिरी पालिका सभा | शहराच्या पाणीपुरवठ्यातील अनियमिततेवरून सभा गाजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. त्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर जनरेटर असूनही पाणी उचल का होत नाही, अशा समस्यांकडे भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. धरणावर झोपा काढणाऱ्‍या पाणी विभागाच्या कर्मचाऱ्‍यांवर कारवाई करा, अशा सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पाणी विभागाच्या अभियंत्यांना केल्या आहेत. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या स्वच्छ करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाला दिल्या.

पालिकेची तातडीच्या विशेष सभेनंतर लगेचच सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. माळनाका येथील पालिकेच्या व्यायामशाळेजवळ असलेल्या चायनीज गाडीवर भांडणे होतात. तेथे दारू पिऊन धिंगाणा घातला जातो, याकडे मागील सभेत ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांनी लक्ष वेधले होते. त्या वेळी सभेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे समीर तिवरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित अधिकारी नंदकुमार मोहिते-पाटील यांनी, त्या वेळी कारवाई करण्यास गेले असता, ती हातगाडी स्वतःहून हलवतो, असे सांगण्यात आले होते, असा खुलासा केला. मात्र, ती गाडी अद्याप तिथेच आहे. आता तातडीने ती हातगाडी जप्त करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या.

हेही वाचा: जायकवाडी : ग्राहकांकडे तब्बल ४२० कोटींची थकबाकी

बेघरांसाठी बांधलेल्या सदनिका..

पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांत अडथळा ठरणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांच्या रुम खाली करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्‍यांना प्रथम पालिकेच्या मालकीच्या नाचणे रोडवरील बेघरांसाठी बांधलेल्या इमारतीतील सदनिका देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या निकषात बसणारे अजून कोणी पुढे आलेले नाही. म्हणून पालिकेच्या त्या कर्मचाऱ्‍यांना पालिकेच्या इतर ठिकाणच्या खोल्या देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे इमारतीतील सदनिका देण्यासंदर्भाचा सभेसमोरील विषय रद्द करण्यात आला.

एक नजर..

  • मुन्ना चवंडे यांनी पाणीपुरवठ्यातील समस्या मांडली

  • तोडणकर यांनी शौचालयांच्या अस्वच्छतेकडे लक्ष वेधले

  • माळनाका येथील चायनीज गाडी जप्त करण्याच्या सूचना

  • धरणावरील कर्मचारी झोपतात...

सभेच्या सुरुवातीलाच सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे यांनी पाणीपुरवठ्यातील समस्यांकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर राजू तोडणकर यांनी सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली जात नाहीत. तेथे पाण्याच्या आणि विजेची सोय नाही, हा मुद्दा मांडला. धरणावर अद्ययावत पंप आहेत. जनरेटरची व्यवस्था आहे, तरीही वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाण्याचे पंपिंग का होत नाही, अशी पाणी विभागाकडे विचारणा केली. धरणावरील कर्मचारी झोपत असल्याने ही वेळ येत असल्याचे कळले. नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्‍यांवर कारवाई करा, असे आदेश दिले.

loading image
go to top