ग्राहकांकडे तब्बल ४२० कोटींची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण तालुक्यात महावितरणची स्थिती

जायकवाडी : ग्राहकांकडे तब्बल ४२० कोटींची थकबाकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जायकवाडी : पैठण तालुक्यातील महावितरण कंपनीची विद्युत ग्राहकांकडे असलेली थकीत ४२० कोटी रक्कम जमा करण्याचे महावितरणचे ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.

जायकवाडी येथील महावितरण कार्यालयात पैठण येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कल्याण रंधे यांनी माहिती देताना सांगितले की, महावितरणकडून पैठण तालुक्यातील सध्यस्थितीत २९ हजार कृषी विद्युत ग्राहकांना विजपुरवठा करण्यात येत असून त्यांच्याकडे एकूण ४२० कोटी रुपये थकीत रक्कम आहे. ज्या ग्राहकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या थकबाकी रक्कमेच्या ५० टक्के रक्कमेपर्यंतची थकबाकी रक्कम महावितरण कार्यालयास भरणा केल्यास अशा ग्राहकास ५० ते ६५ टक्केपर्यंत विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत असून यासाठी सप्टेंबर २०२० पासून ते मार्च २०२२ पर्यंतचे चालू बिल भरणे आवश्यक आहे.

चालू बिल न भरल्यास विजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी नियमित विजबिल भरल्यास बिलात १० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच चालू दोन बिले भरल्यास तात्पुरत्या स्वरूपात विजपुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा: अकोला शहरात २९ प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी

सध्या शेतकऱ्यांसाठी तिन एचपी पंपासाठी पाच हजार रुपये,पाच एचपी पंपासाठी सात हजार पाचशे रुपये, साडेसात एचपी पंपासाठी दहा हजार रुपये तर दहा एचपी पंपासाठी पंधरा हजार रुपये भरणे आवश्यक असल्याचे उपकार्यकारी अभियंता कल्याण रंधे यांनी सांगितले. तसेच पैठण उपविभागात घरगुती,व्यवसायिक, औद्योगिक या ग्राहकांकडे १५ कोटी, पथदिव्यांची ६२ कोटी,पाणी पुरवठा ५ कोटी अशा प्रकारे ४८२ कोटी थकीत रक्कम झाल्याचे सांगून महावितरण कडून थकबाकीदार यांनी तात्काळ थकबाकी रक्कम भरून महावितररणास सहकार्य करुन गैरसोय टाळावी आवाहन केले आहे.

loading image
go to top