...अन् पोलिसांच्या सर्कतेमुळे वाचला त्या युवकाचा जीव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

हेल्पलाईनवरील तो फोन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून आल्याचे तपासातनू पुढे आले.

रत्नागिरी - ऑनलाईन फसवणुकीत लाखभर रूपये गमावल्याच्या नैराश्यामधून एका तरूणाने जीव देत असल्याचे हेल्पलाईनला रात्री साडेबारा वाजता बोलून दाखवले आणि पोलिस सतर्क झाले. ट्विटद्वारे मुंंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना सूचना देत ऑपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी त्या युवकाचा माग काढला आणि त्याचा जीव वाचला.

हेल्पलाईनवरील तो फोन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून आल्याचे तपासातनू पुढे आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधला. काही क्षणातच रत्नागिरी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून त्याला प्रतिसाद मिळाला. याची कल्पना आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व पोलिस निरीक्षक सासणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांचे सायबर सेल अलर्ट झाले. सायबर सेलला या फोन करणार्‍या तरुणाचे लोकेशन पोलिस नाईक शेख यांनी दिले. सायबर सेलने त्या व्यक्तीचे घर शोधले, त्याला तात्काळ फोन केला. त्याचवेळी खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना याची माहिती देण्यात आली. सुवर्णा पत्की यांनी पीएसआय शेणोलीकर, हवालदार साळवी आणि कॉन्स्टेबल धाडवे, श्री. येलकर यांना त्या युवकांच्या घरी पाठवले. एकीकडे सायबर सेलचे श्री. गमरे हे दुरध्वनीवरुन त्या युवकाचे समुपदेशन करत होते. त्याचवेळी खेड पोलीस त्या युवकाच्या घरी पोहोचले होते. त्या युवकाची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक झाली होती. ते पैसे त्याने बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. फसवणूकीच्या निराशेतून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता.

हे पण वाचा -  ब्रेक द चेन ; रत्नागिरीत पुन्हा एकदा १ ते ८ जुलै पर्यंत लॉकडाऊन ; या काळात हे राहणार सुुुरु हे बंद 

रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडिया, सायबर सेल, खेड पोलीस यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका युवकाचा जीव वाचला. या युवकाला ऑनलाईन फसवणुकीप्रकारणी तक्रार देण्यास सांगितले असून आम्ही त्याला संपूर्ण मदत करू असे यावेळी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितले. संकटात नागरिकांनी खचून न जाता आपल्या समस्येचा मार्ग शोधावा व गरज असल्यास रत्नागिरी पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri police save life for youth who tray committed suicide