मातोश्री कधीच कुणाला निमंत्रण देत नाही 

मातोश्री कधीच कुणाला निमंत्रण देत नाही 

गुहागर - आमदार भास्कर जाधव मोठा राजकीय डाव खेळले आहेत. त्यांच्या या खेळीने युतीच्या जागा वाटपात जागा कोणाला, युती होणार का, असे प्रश्न गुहागरमध्ये निर्माण झाले आहेत. गुहागर, चिपळूणमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून मातोश्री कधीच कुणालाही निमंत्रण देत नाही. स्वत:च्या आणि मुलाच्या राजकीय अस्तित्वासाठी हे सर्व चालले आहे, असा शेलका आहेर शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी जाधव यांना दिला. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी भाजपसमोर लोकसभा आणि विधानसभा अशा दोन जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपकडून एका जागेची हमी देण्यात आली. त्यामुळे हा विषय तेथेच थांबला, अशी चर्चा होती. आता पुन्हा एकदा घरवापसीचा विषय चर्चेत आला. मात्र, या सर्व अफवाच आहेत, असे ते सांगत राहिले. चिपळूणात पत्रकार परिषदेतही त्यांनी शिवसेनेकडून निमंत्रण असल्याचे सांगत आपण निर्णय घेतलेला नाही, हे स्पष्ट केले.

या सर्व घटनाक्रमामुळे पुन्हा एकदा कोकणातील राजकारण स्वत:भोवती फिरवत ठेवण्यात आमदार जाधव यशस्वी ठरले. गुहागरात युतीचा उमेदवार भाजपचाच असणार, येथून भाजपचाच आमदार निवडून येणार, इथंपासून माजी आमदार डॉ. नातूंची उमेदवारी निश्‍चित झाली आहे, असा संदेश भाजपचे वरिष्ठ नेते देत असताना जाधवांनी ठाकरे भेटीची कबुली दिली. त्यामुळे युतीच्या जागावाटपात गुहागरची जागा भाजपला मिळणार की नाही, 2009 च्या पार्श्‍वभूमीवर या जागेवर शिवसेनेने दावा केला का, याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर गुहागरमधून विधानसभा लढविण्यास उत्सुक आहेत. आयत्यावेळी शिवसेनेने जाधव किंवा त्याचा मुलगा विक्रांत यांना उमेदवारी दिली तर काय, अशी अस्वस्थता शिवसेनेच्या गोटात आहे. तिवरे धरण दुर्घटनेनंतर चिपळूणमधील जागाही भास्कर जाधव किंवा विक्रांत जाधव यांना गेली तर काय करायचे, असा प्रश्न चिपळूणमधील शिवसैनिकांना सतावत आहे. 

भास्कर जाधव पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. कोकणातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. गेल्या पाच वर्षांत पक्षांतर्गत नाराजीही त्यांनी दूर केली आहे. त्यामुळे ते अन्यत्र जाणार नाहीत. 
- बाबाजी जाधव,
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com