esakal | रत्नागिरी, सिंधुदुर्गात आणखी तीन दिवस मुसळधार; आतापर्यंत ८०० मीमी पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

rain

कोकणात आणखी तीन दिवस मुसळधार; आतापर्यंत ८०० मीमी पावसाची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ८०० मीमी अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३,३६४ मिमी असून गेल्या १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ३५३०.०२ मिमी नोंद झाली आहे. गणेशोत्सवातही पावसाचा अभिषेक सुरू आहे.

मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. त्याचा जोर सातत्याने वाढतच होता. जुलैच्या मध्यात विक्रमी नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला होता. प्रत्येक महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत तीन हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

हेही वाचा: पंचगंगा पाचव्यांदा पात्रा पात्राबाहेर ; 21 बंधारे पाण्याखाली

रविवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३५.१३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ४०.२०, दापोली ४६.४०, खेड ५४.४०, गुहागर २९.८०, चिपळूण ४०.८०, संगमेश्‍वर २७.७०, रत्नागिरी १६.१०, लांजा २६.१०, राजापूर ३४.७० नोंद झाली. रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. अधुनमधून पावसाच्या सरी पडून जात होत्या. दुपारच्या सत्रात सूर्यदर्शन झाले; मात्र त्याचा प्रभाव थोडाचवेळ होता. हे वातावरण भातशेतीला पोषक असल्याचे बळीराजाकडून सांगितले जात आहे. १२० दिवसांची बियाणे तयार झाली असून वीस दिवसात ती कापणीयोग्य होतील. तोपर्यंत पावसाने विश्रांती घेतली तर त्याचा फायदा निश्‍चितच शेतकऱ्यांना कापणीची कामे आटोपण्यास होईल. कापणीला शेतीला अजून महिन्याभराचा कालावधी आहे. त्यामुळे सध्याचा पाऊस पोषक ठरु शकतो, असे शेतकरी संतोष भडवळकर यांनी सांगितले.

गुहागर तालुक्यातील वेलदूर-धोपावे मार्गावर दरड कोसळली होती. मात्र ही दरड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र येथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका पाऊस (मिलीमीटर)

* खेड ३८८०

* रत्नागिरी ३६८१

* संगमेश्वर ३६८०

* लांजा ३४६४

* चिपळूण ३४६२

* मंडणगड ३४६१

* गुहागर ३६२८

* दापोली ३२८९

* राजापूर ३२२२

वैभववाडी परिसरात सर्वाधिक पाऊस

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २४ तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४३.०७५ मिलीमीटर पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ३६०७.८५७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

  • दोडामार्ग - ५३ (३५६१)

  • सावंतवाडी -५६ (३९३२.१)

  • वेंगुर्ला - १८.६ (२८४८.८)

  • कुडाळ -३८ (३४८१)

  • मालवण -५० (३८७९.९६)

  • कणकवली - ३०(३९६३)

  • देवगड -११ (३०९७)

  • वैभववाडी - ८८ (४१००)

loading image
go to top