esakal | Ratnagiri : बाजार लखलखला; बाप्पा पावला
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Ratnagiri : बाजार लखलखला; बाप्पा पावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तीन-चार दिवसांच्या संततधार पावसानंतर आज ता. ९ कडकडीत ऊन पडल्यानंतर रत्नागिरीची बाजारपेठ लखलखली. लाडक्या गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली. सजावट साहित्य, मेवा-मिठाई, प्रसाद साहित्य, कपडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीमुळे कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या व्यापाराला आज गणपती बाप्पा पावला. दरम्यान आज सकाळी हरतालिकेची पूजा करून महिलांनी व्रत केले.

कोकणातील सर्वांत लोकप्रिय गणेशोत्सवाची धूम उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबईकर चाकरमानी लाखोंच्या संख्येने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी स्थानिकांसह मुंबईकर चाकरमानीसुद्धा पाहायला मिळत आहेत. गेले दीड वर्ष कोरोना महामारी, तौक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटात सापडल्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाली नव्हती. परंतु आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे.

हेही वाचा: 'कोकणवासीयांना ठाकरे सरकारने वाऱ्यावर सोडलंय'

श्री रत्नागिरीचा राजा सलग दुसऱ्या वर्षी रद्द

यंदा मारुती मंदिर येथे स्थानापन्न होणारा श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. अनेक

मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळून आणि कोरोनाविषयक नियम पाळूनच उत्सव होणार असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन मंडळांनी केले आहे.

या कुटुंबासाठी मदत

कोरोनामुळे यंदा काही घरांमध्ये कर्ता पुरुष किंवा व्यक्तीचे निधन झाल्यामुळे अनेक घरांमध्ये गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे. काही जणांनी गणपती दीड दिवसांनंतर विसर्जन करण्याचे ठरवले आहे. काही गावांमध्ये निधन झालेल्या कुटुंबांसाठी मदत करण्याचे कामही वाडीतील शेजारी मंडळी करत आहेत.

हेही वाचा: Devrukh : खड्डेच चोहीकडे; प्रवाशांचे मोडले कंबरडे

यावेळी गणपतीच्या स्वागताची तयारी

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे गणेश पूजा अगदी साधेपणाने साजरी केली. परंतु यावेळी लोक कोरोना नियम पाळून गणेश चतुर्थीचा कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि गणपतीच्या स्वागताची तयारी केली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आज पावसाने विश्रांती घेतल्याने बहुतांशी भाविकांनी बाप्पांना वाजत-गाजत घरी आणले. गुलालाची उधळण करत भाविकांनी बाप्पांचे स्वागत केले.

गुरुवारी (ता. ८) संततधार असूनही भाविकांची बाजारात गर्दी होती. आज सकाळी ऊन पडल्यामुळे सर्वच दुकानांत खरेदीसाठी आसपासच्या गावांतील अनेक लोक आले. सजावट साहित्य, गोड प्रसादाचे साहित्य, पूजा साहित्य यांसह फुले, फळे यांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. बऱ्याच दिवसांनी बाजारपेठ फुलली.

- नागेश आवटी, व्यापारी

loading image
go to top