'जिल्हा नियोजन'मध्ये कॉंग्रेसची दहशत - रवींद्र चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

भावनिक आवाहनाचे दिवस संपले! 
जिल्हा परिषद निवडणुका आल्या की, कॉंग्रेसच्या मंडळींकडून नेहमीच भावनिक आवाहने केली जातात. मात्र यंदाच्या निवडणुकीत इथली जनता कॉंग्रेसच्या कुठल्याच भावनिक आवाहनांना बळी पडणार नाही. उलट मतदार पारदर्शक आणि विकासाचे काम करणाऱ्या भाजप उमेदवारांनाच निवडून देतील, असे श्री. चव्हाण म्हणाले. 

कणकवली - स्वपक्षातील उमेदवार कमी पडले म्हणून की काय, कॉंग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. ठेकेदारांशी हातमिळवणी करून जिल्ह्यातील रस्त्यांची वाताहत केली. एवढेच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीमध्येही दहशत निर्माण केली; मात्र या निवडणुकीत आम्ही जनतेच्या पाठबळावर या भ्रष्टाचाऱ्यांना निपटून काढू आणि जिल्हा परिषदेचा स्वच्छ व पारदर्शक कारभार दाखवून देऊ, असा दावा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केला. 

येथील मराठा मंडळ सभागृहात भाजपच्या प्रचाराचा नारळ श्री. चव्हाण यांनी फोडला. भाजपचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्यासह संदेश पारकर, अतुल रावराणे, दीपक सांडव, जयदेव कदम, काका कुडाळकर, रवींद्र शेटये आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, ""कॉंग्रेस आघाडी सरकारने जिल्ह्याचा विकास ठप्प केला होता. सी वर्ल्ड प्रकल्प तर एक इंचही देखील पुढे सरकला नव्हता. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर सिंधुदुर्गच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. सी वर्ल्ड प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत, त्यांना बाजारभावाने मोबदला दिला जाणार आहे. केंद्राच्या माध्यमातून विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय धर्तीवर विकसित केले जात आहे. त्या अनुषंगाने गोवा एमएमबी, जेएनपीटी यांच्यात लवकरच सामंजस्य करार होईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण आदी अनेक प्रश्‍न आम्ही मार्गी लावत आहोत.'' 

ते म्हणाले, "जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य, पदाधिकारी, प्रशासन आणि पत्रकार यांनाच प्रवेश असायला हवा. पण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेस नेत्यांचे बॉडीगार्ड, प्रचंड संख्येने कार्यकर्ते आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपसह इतर पक्षातील सदस्यांनी नियोजन समितीमध्ये जाणेच सोडून दिले.'' 
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढवीत आहोत. भाजप प्रथमच पंचायत समितीच्या 82 आणि जिल्हा परिषदेच्या 45 जागा लढवीत आहे. आज या सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांना स्मरून पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची शपथ घेतली. नगरपालिका निवडणुकांप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही भाजपचेच सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असेही श्री. चव्हाण म्हणाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रचारासाठी सिंधुदुर्गात येणार असल्याचे ते म्हणाले. 

भावनिक आवाहनाचे दिवस संपले! 
जिल्हा परिषद निवडणुका आल्या की, कॉंग्रेसच्या मंडळींकडून नेहमीच भावनिक आवाहने केली जातात. मात्र यंदाच्या निवडणुकीत इथली जनता कॉंग्रेसच्या कुठल्याच भावनिक आवाहनांना बळी पडणार नाही. उलट मतदार पारदर्शक आणि विकासाचे काम करणाऱ्या भाजप उमेदवारांनाच निवडून देतील, असे श्री. चव्हाण म्हणाले. 

Web Title: ravindra chavan criticize congress