राजापूर पालिकेतही रिफायनरीचा मुद्दा ; शिवसेना सदस्य गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपालिकेची सभा पार पडली.

राजापूर - तालुक्‍यातील रिफायनरी प्रकल्पाला दिवसागणिक समर्थन वाढत असताना आज झालेल्या नगरपालिकेच्या सभेमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा झाली. स्थानिक पातळीवर ऐंशी टक्के जनतेचे समर्थन लाभले असेल तर त्याचा पालिकेतील सत्ताधारी गट सन्मान करेल, अशी भूमिका नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी स्पष्ट केली; मात्र ठोक निधीसंबंधित चर्चेनंतर सभात्याग केल्याने विरोधी गट असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक यावेळी अनुपस्थित राहिले. 

नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपालिकेची सभा पार पडली. या सभेच्या आयत्या वेळच्या विषयाच्यावेळी सत्ताधारी आघाडीला साथ देणारे भाजपचे नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या रिफायनरी प्रकल्पाची केवळ त्या परिसरातील दहा-बारा गावांपुरती व्याप्ती नसून त्याचा फायदा राजापूर तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे. विकासकामांसाठी आवश्‍यक असलेल्या निधीसाठी शासनावर अवलंबून असलेल्या नगरपालिकेलाही निधीच्या अनुषंगाने या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव पारित करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. याबाबत आपणासह वकील संघटनेने नगराध्यक्षांना पत्र दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्नेहा कुवेसकर यांनी प्रकल्पग्रस्त भागांतील जनतेचा जर पाठिंबा असेल तर आपण ठराव करूया, असा मुद्दा मांडला. उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, परवीन बारगीर आणि आसिफ मुजावर यांनी प्रकल्प आल्याशिवाय राजापूरचा कोणताच विकास होणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला समर्थन दर्शवले. स्वीकृत नगरसेवक हनिफ काझी यांनी आपली कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांनी विकास व्हायचा असेल तर प्रकल्प होणे गरजेचे आहे, असे मत मांडले. 

हे पण वाचाजिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य 

 

 
कॉंग्रेसची भूमिका अस्पष्ट 
चर्चेच्या वेळी नगरसेवक व कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी, या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येणार असल्याचे चित्र असले तरी, कॉंग्रेसने अद्याप प्रकल्पाबाबत भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले, तर कॉंग्रेसच्या नगरसेविका मुमताज काझी यांनी या प्रकल्पामुळे दीडशे कि. मी. अंतरापर्यंत आंब्याची झाडे नष्ट होणार असल्याचा मुद्दा मांडला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refinery issue in Rajapur Municipality