'रिफायनरीला काँग्रेसचा विरोधच; प्रदेशाध्यक्षांची मते जाणून घेणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

प्रकल्प भागातील स्थानिकांमध्ये दहा टक्के लोकांचे समर्थन असून उर्वरितांचा विरोध आहे.

'रिफायनरीला काँग्रेसचा विरोधच; प्रदेशाध्यक्षांची मते जाणून घेणार'

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेसने विरोध केला आहे. परंतु २९ ला दौऱ्यावर येणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रिफायनरीसंदर्भात दोन्ही मत प्रवाह ऐकून घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे सध्या तो विषय आमच्या दृष्टीने संपला आहे. पुन्हा तसा विषय झालाच, तर त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिफायनरीविषयी काँग्रेसची भूमिका मांडली. ते म्हणाले की, रिफानरी प्रकल्पासंदर्भात स्थानिकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. प्रकल्प भागातील स्थानिकांमध्ये दहा टक्के लोकांचे समर्थन असून उर्वरितांचा विरोध आहे. तसेच नाणार परिसराच्या आजूबाजूला असलेल्या भागातील अनेक बेरोजगारांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे ते या प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले आहेत. पण बहुतांश स्थानिकांचा प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोधच आहे.

दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा

अविनाश लाड म्हणाले, काँग्रेसनेही रिफायनरीला पहिल्यापासून विरोध दर्शवलेला आहे. या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले २९ ला येणार आहेत. त्या वेळी दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करणार आहेत. या परिसरातील लोकांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प आणणे आवश्यक आहे. त्यासाठी आयटी क्षेत्रासह ऑटोमोबाईलशी निगडित उद्योग येथे आले पाहिजेत. केमिकल प्रकल्प या ठिकाणी आणण्यास आमचा विरोध आहे.

त्याला तेवढे महत्व नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प कोकणात येणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बारसू-सोलगाव येथे रिफायनरीसंदर्भात लोकांची मते जाणून घेण्याचे वक्तव्य केले असले तरी त्याला तेवढे महत्व नाही. काँग्रेसचा त्याला विरोधच आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली तर त्यावर योग्य तो विचार केला जाईल, असे मत लाड यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर व्यक्त केले.

टॅग्स :Refinery Project