कोकणातच होणार रिफायणरी प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला, असला तरी जागा देतील तिथे कोकणातच हा प्रकल्प होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असे वक्तव्य भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आणि एका नव्या संशयाला तोंड फुटले.

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला, असला तरी जागा देतील तिथे कोकणातच हा प्रकल्प होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असे वक्तव्य भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आणि एका नव्या संशयाला तोंड फुटले. प्रकल्प कोकणातून रद्द करण्याच्या अटीवरच युती झाली होती. तोच प्रकल्प कोकणात होणार असल्याचे सूतोवाच जठार यांनी केल्याने युतीतील संबंध ताणले जाण्याची शक्‍यता आहे.

नाणार (ता. राजापूर) येथे देशातील सर्वांत मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता. सुमारे १५ हजार एकर जमीन त्यासाठी संपादित केली जाणार होती, मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला सुरवातीपासून विरोध केला. स्थानिकांच्या भूमिकेला सेनेने पाठिंबा दिला. 

भाजपने प्रकल्प होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. यावरून सेना-भाजपचे संबंध अधिक ताणले गेले. शिवसेनेने अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली होती, मात्र त्याला कागदोपत्री काहीच दुजोरा नव्हता. भाजपने खेळी करत हा विषय झुलवत ठेवला होता. लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर तो अधिकच पेटला. संघर्ष समित्यांपासून अनेक शिष्टमंडळे उद्धव ठाकरे यांना भेटली. त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा शब्द दिला. ज्या अटीवर सेना-भाजप युती झाली, त्यामध्ये नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट होती.  

मुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहा यांनी ही अट मान्य केल्यानंतर युती जाहीर करण्यात आली. ३ मार्चला रत्नागिरीत झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. राज्यपत्रातील नोंदीची प्रतही देण्यात आली. प्रकल्प रद्द झाल्याचे घोषणा झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी बंड पुकारले. प्रकल्प रद्द झाल्यामुळे लाखो तरूण रोजगाराला मुकल्याचे स्पष्ट करीत युती असली तरी वेळ प्रसंगी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढू, असा इशारा दिला.

जुने विसरा; कामाला लागा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सेनेशी जुळवून घेऊन युतीचे काम करण्याचा निर्णय झाला. आज त्याची प्रचीती महायुतीच्या मेळाव्यात दिसून आली. या मेळाव्यात प्रमोद जठार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये जागा देतील त्या ठिकाणी, पण कोकणातच प्रकल्प होईल, असा शब्द दिला. त्यामुळे जुने सर्व विसरा आणि कामाला लागा. त्यांच्या वक्तव्यातील विसंगतीमुळे नवीन प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: refinery project will be in Konkan Pramod Jathar comment