जठार यांना गिर्ये-रामेश्‍वरमधील रिफायनरीविरोधकांनी रोखले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

देवगड - तालुक्‍यातील विजयदुर्गच्या दिशेने निघालेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांना गिर्ये-रामेश्‍वर परिसरात रिफायनरीविरोधक स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

देवगड - तालुक्‍यातील विजयदुर्गच्या दिशेने निघालेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांना गिर्ये-रामेश्‍वर परिसरात रिफायनरीविरोधक स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने श्री. जठार यांना पुढे जाण्यास मज्जाव करताच श्री. जठार यांना तेथूनच माघारी परतावे लागले. या वेळी मोठा जमाव होता.

दरम्यान, जनतेच्या भावनांचा आदर करीत आपण तेथून माघारी परतल्याचे श्री. जठार यांनी पत्रकारांना सांगितले.
किल्ले विजयदुर्गवर होणाऱ्या ‘हेलियम डे’च्या निमित्ताने येणाऱ्या श्री. जठार यांना परिसरात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या तीव्र भावना समजाव्यात, यासाठी रस्त्यावर उतरून काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय स्थानिकांकडून घेण्यात आला होता. मात्र, माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ‘हेलियम डे’ जल्लोषात साजरा न करण्याचा 
निर्णय भाजपतर्फे घेण्यात येऊन तसे जाहीरही करण्यात आले होते.

दरम्यान, श्री. जठार आपल्या कार्यकर्त्यांबरोबर आज विजयदुर्गला निघाले होते. मात्र, आधीच जाहीर केल्याप्रमाणे प्रकल्पविरोधी जनता रस्त्यावर श्री. जठार यांची वाट पाहत थांबली होती. श्री. जठार यांच्या वाहनाचा ताफा तेथे पोचताच त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी श्री. जठार यांच्याबरोबर भाजपचे माजी आमदार ॲड. अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी होते.

स्थानिकांमध्ये महिलांचाही समावेश होता. जमावाच्या तुलनेत पोलिस कुमकही काहीशी तुटपुंजीच होती. श्री. जठार यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्याची तयारी दर्शवली. मात्र, जमावाचा वाढता रोष पाहता अखेर श्री. जठार यांना तेथून माघारी परतण्याची वेळ आली.

दरम्यान, जनतेच्या भावनांचा आदर करून आपण माघारी परतलो. स्थानिकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविले जाईल, असे प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, या वेळी तणाव निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने पोलिस याठिकाणी आधीच पोचले होते.

Web Title: reflationary agitation in Girye Rameshwar