esakal | एसटीने शोधलाय आता उत्पन्नाचा नवा स्त्रोत; खासगी वाहनांसाठी `ही` सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Remold Facility Now Available In ST Plant To Private Vehicles

कोरोना महामारी व लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसतोय. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणाऱ्या रा. प. महामंडळाची 90 ते 95 टक्के वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कामगारांना पगार देणेही शक्‍य होत नाही.

एसटीने शोधलाय आता उत्पन्नाचा नवा स्त्रोत; खासगी वाहनांसाठी `ही` सुविधा

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - कोरोना, लॉकडाउनमुळे एसटी सेवा बंद आहे. त्याचा फटका बसू लागल्याने एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक सुरू केली. आता पुढच्या टप्प्यावर राज्यातील 9 टायर रिट्रेटिंग प्लॅंटमध्ये खासगी वाहनांचे टायर्स कोल्ड प्रोसेसिंग पद्धतीने रिमोल्ड करून देण्यास सुरवात केली आहे. यांच्या दरामध्ये बाजारभावापेक्षा सुमारे पाचशे ते आठशे रुपयांचा फरक ठेवला आहे. रत्नागिरीतील टीआरपी येथील प्लॅंटमध्येही ही सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहे. 

यासंदर्भात टीआरपी प्लॅंटचे यंत्र अभियंता प्रमोद जगताप यांनी सांगितले, कोणत्या रस्त्यांवर वाहन चालवतो, कसे चालवतो, वाहनाची क्षमता आणि किती किमी प्रवास झाला. यावर टायरचे आयुष्य अवलंबून असते. असे रिमोल्डिंगसाठी टायर्स टीआरपी प्लॅंटमध्ये दिल्यास एसटीचे पर्यवेक्षक टायरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतात. साधारण एका दिवसात टायर रिमोल्डिंग करून देता येऊ शकतो. एका दिवसात 150 टायर्स रिमोल्ड करण्याची या प्लॅंटची क्षमता आहे. 

कोरोना महामारी व लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसतोय. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणाऱ्या रा. प. महामंडळाची 90 ते 95 टक्के वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कामगारांना पगार देणेही शक्‍य होत नाही. त्यावर उतारा म्हणून सुरवातीला खासगी मालवाहतूक एसटीने सुरू केली. आता टायर रिट्रेडिंग करण्यास सुरवात केली आहे.

रत्नागिरीतील प्लॅंट 1985 मध्ये सुरू झाला. सध्या येथे 38 कारागीर, कर्मचारी काम करत आहेत; परंतु जादा काम आल्यास येथे विभागीय कार्यशाळेतील कारागिर उपलब्ध करून दिले जातात. पूर्वी एसटीच्या पाच विभागांना येथून टायर्स रिमोल्ड करून दिले जातात. सध्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात टायर्स देण्यात येतात. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दुचाकी, रिक्षांचे टायर्सही रिमोल्ड करण्याचा महामंडळाचा विचार आहे. 

पाच प्रकारचे टायर्स 

सध्या टायरचे आकारमान 7.50 बाय 16.9 बाय 20 (नायलॉन आणि रेडियल), 10 बाय 20 आणि 295 बाय 80 आर 22.5 या आकारातील टायर्सचे काम केले जाणार आहे. याचा दर साधारण 2500 ते 4500 रुपयांपर्यंत असल्याची माहिती उपयंत्र अभियंता प्रकाश सावंत यांनी दिली.