करूळ घाट दुरुस्ती युद्धपातळीवर 

एकनाथ पवार
Sunday, 18 October 2020

अतिवृष्टीने करूळ घाटरस्ता खचला होता. तिथपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - खचलेल्या करूळ घाटरस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेले तीन दिवस हे काम सुरू असून उद्या (ता. 19) दुपारनंतर हे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता आहे. अतिवृष्टीने करूळ घाटरस्ता खचला होता. तिथपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. 

तालुक्‍यात 14 आणि 15 ऑक्‍टोबरला मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांत तब्बल 239 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसाचा जोर सह्याद्री पट्ट्यात अधिक होता. त्यामुळे घाट परिसरात देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी उशिरा करूळ घाटरस्ता खचला. रस्त्याच्या निम्मा अधिक भाग खचला गेला. रस्त्याकडेला बॅरेल उभी करून घाटरस्त्यात अडकलेली वाहने सोडण्यात आली; परंतु त्यानंतर रस्त्याचा आणखी काही भाग खचला. त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे या मार्गाने वाहतूक करणे जिकिरीचे आणि धोकादायक ठरण्याची शक्‍यता होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून हा घाटरस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद करण्यात आला.

सर्वाधिक वाहतूक असलेला घाटमार्ग बंद झाल्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना मनस्ताप झाला. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. वैभववाडी ते भुईबावडा बाजारपेठ या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून खचलेल्या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. खचलेल्या भागात दगड भरलेली बॅरेल रचली जात आहे. जेसीबी आणि बांधकामचे कर्मचारी हे काम करीत आहेत.

तात्पुरत्या दुरुस्तीचे काम धोकादायक असल्यामुळे अतिशय सावधगिरीने हे काम सुरू आहे. गेले तीन दिवस हे काम सुरू आहे. उद्या दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा बांधकामच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे उद्या दुपारनंतर वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता आहे. जरी या मार्गे वाहतूक सुरू झाली तरी ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथून एकावेळी एकच वाहन सोडता येणार आहे. 

""खचलेल्या करूळ घाटरस्त्याचे काम सुरू आहे. गेले तीन दिवस हे काम सुरू असून सोमवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जेसीबीच्या साहाय्याने हे काम जरी केले जात असले तरी बॅरेल रचण्याचे काम कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. बांधकामचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे काम करीत आहेत. उद्या दुपारपर्यंत काम पूर्ण झाले तर दुपारनंतर वाहतूक सुरू करण्यात येईल.'' 
- एस. पी. हिरवाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी. 
 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair of Karul Ghat in Sindhudurg district started