सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने 'या' प्रवाळ बेटाचे होणार संशोधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सिंधुदुर्गातील सागरी जैवविविधेतेचे संवर्धन करून जागतिक दर्जाचे पर्यटन व शाश्‍वत मासेमारीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने आंग्रीया बॅंक या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - येथील समुद्रात असलेल्या जैवविविधतेने समृद्ध आंग्रीया बॅंक या प्रवाळ बेटाचे सोळा शास्त्रज्ञांचे पथक अभ्यास करणार आहे. याचा अहवाल पर्यटन विकास महामंडळाला सादर केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाबरोबरच सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण मोहीम ठरणार आहे. 

देशाच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा आंग्रीया बॅंक प्रकल्प राबविण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयातर्फे 18 ते 28 डिसेंबर या कालावधीत आंग्रीया बॅंक येथे सागरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तारकर्ली येथील इस्दा संस्थेचे सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी, स्कूबा डायव्हिंग मास्टर नुपूर तारी, वरिष्ठ स्कूबा प्रशिक्षक जितेश वस्त यांच्यासह देशभरातील 16 शास्त्रज्ञ मोहिमेत सहभागी होत आहेत. मोहिमेचा अहवाल पर्यटन विकास महामंडळाला सादर केला जाणार असून ते हा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. 

हेही वाचा - मंत्रीपदासाठीच हे आमदार करताहेत राणेंवर टिका 

देशभरातून 16 तज्ज्ञ सहभागी

सिंधुदुर्गातील सागरी जैवविविधेतेचे संवर्धन करून जागतिक दर्जाचे पर्यटन व शाश्‍वत मासेमारीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने आंग्रीया बॅंक या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाने आंग्रीया बॅंक सागरी मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेत इस्दा संस्थेतील तीन तज्ज्ञांसह देशभरातून 16 तज्ज्ञ सहभागी होत आहेत. जैवविविधतेचा अभ्यास करणे, हा मुख्य उद्देश आहे. मोहिमेत जी माहिती मिळेल ती पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याचा फायदा या ठिकाणी पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठीचा आवश्‍यक आराखडा तयार करण्यास राज्य शासनाला होणार आहे. 

या संस्थामधील शास्त्रज्ञांचा सहभाग

मोहिमेत कर्नाटक, मंगळूर येथील वाईल्ड लाईफ कन्झरमेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग, पर्यटन विकास महामंडळाची इस्दा संस्था, कोचीन येथील सीएमएलआरई ही अर्थविज्ञान मंत्रालय या संस्थामधील शास्त्रज्ञ सहभागी होत आहेत. मोहिमेसाठी कोचीन येथून जहाज निघणार आहे. आंग्रीया बॅंक येथील समुद्रात दहा दिवस या शास्त्रज्ञांचे वास्तव्य असणार आहे. या कालावधीत त्या भागात खोल समुद्रातील जैवविविधतेचा अभ्यास होणार आहे. त्याचा फायदा भविष्यात कोकणाला, सिंधुदुर्गला होईल. 

हेही वाचा - निवडणूकीत उमेदवारी मागे घ्यायला लागली या रागातून खून

आशा पल्लवीत 

आंग्रीया बॅंक येथे पर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी असताना 2008 मध्ये अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद केली होती. काही कारणांमुळे प्रकल्प पुढे गेला नाही; मात्र आज योगायोगाने जयंत पाटील पुन्हा अर्थमंत्री असल्याने या प्रकल्पाला चालना मिळेल, अशी आशा आहे. 

अशी आहे आंग्रीया बॅंक 

मालवणपासून 110 किलोमीटर तर विजयदुर्गपासून 90 किलोमीटर दूर समुद्रात प्रवाळ बेट आहे. समुद्राच्या आत विशेषतः चिखलापासून बनलेल्या या बेटाची व्याप्ती 40 किलोमीटर लांब आणि 18 किलोमीटर रुंद आहे. यावर समृध्द असे सागरी जीवन आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होऊ शकते. या संशोधन मोहिमेमुळे या प्रवाळ बेटाची अनेक रहस्य पुढे येऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research On Angria Bank The Coral Island For Sea Environment