असहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन

अमित गवळे  
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍यांना पकडा या मागणीसाठी रायगड जिल्हा महा. अंनिसच्या वतीने सोमवारी (ता.20) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍यांना पकडा या मागणीसाठी रायगड जिल्हा महा. अंनिसच्या वतीने सोमवारी (ता.20) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाला देखील साडेतीन वर्षे आणि प्रा.डॉ.एम.एम. कलबुर्गी यांच्या खुनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या खूनाचा तपास दिरंगाईमुळे वर्षभरापूर्वी पत्रकार गौरी लंकेश यांचाही खून याच पद्धतीने झाला. महाराष्ट्र शासन, कर्नाटक शासन आणि भारत सरकारच्या या सर्व खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे पोलिस दलाचे हसे होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिस, सम विचारीची पक्ष संघटना व संस्थांच्या सहभागाने आज 20 ऑगस्ट 2018 रोजी अलिबाग येथे ‘जवाब दो’ आंदोलन केले. त्याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मानवी साखळीचे आयोजन करून महावीर चौक - बालाजी नाका - मारूती नाका - अप्सरा हॉटेल - स्टेट बँक ऑफ इंडिया ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे रॅली संपन्न होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दोन वर्षांपूर्वी डॉ. वीरेंद्र तावडेला झालेली अटक आणि दोन दिवसांपूर्वी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना संशयित मारेकरी म्हणून झालेल्या अटकेबद्दल महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या विशेष पथकाचे कौतुक केले. आणखी सखोल तपास करून हा कट रचणारे व कटाची प्रेरणा देणर्‍या व्यक्ती- संघटनांना समोर आणावे ही मागणी प्रामुख्याने केली आहे. जोपर्यंत या कटाची पाळेमुळे खोदून काढली जात नाहीत, तो पर्यंत समाजातील विवेकवादी लोकांना असलेला धोका हा कायम राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश ह्यांच्या खूनांच्या घटनांमधील साम्यस्थळे लक्षात घेता खुनाच्या तपासाबाबत आणखी काही मागण्या केल्या आहेत.

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांसंबंधात सनातन, हिंदू जनजागरण समिती या संस्थांची नावे वारंवार समोर येत आहेत. शासनाने दाखल केलेल्या आरोपपत्रातही या संघटनांचा उल्लेख आहे. त्यामुळे या संस्थांची सखोल चौकशी करून या संघटनांवर सनदशीर मार्गाने कायदेशीर कारवाई करावी. तसेच या संस्थांच्या हालचालीवर बारीक लक्ष्य ठेवावे. सारंग अकोलकर, प्रविण निंबकर, रूद्र पाटील व जयप्रकाश हेगडे ह्या एन. आय. ए. ला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासातील संशयित विनय पवार यांचा तपास लावण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या कटामध्ये सनातन संस्था व हिंदू जनजागरण समिती यांच्या साधकांची नावे तपासात पुढे आली आहेत. या संस्थांविषयीची भूमिका राज्याची भूमिका राज्याचे कार्यकारी प्रमुख जनतेसमोर लवकरात लवकर मांडावी. अशा मागण्या महाराष्ट्र अंनिसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. जवाब दो आंदोलनात मानवी साखळी व रॅलीदरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणा, चळवळची गाणी व पथनाट्य सादर केले.
 
या आंदोलनात महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनांचे जिल्हा भरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोहन भोईर,  कार्याध्यक्ष, म अं.नि.स., जिल्हा रायगड, नितीनकुमार राऊत, राज्यसरचिटणीस, म अं.नि.स., मुंबई व कोकण, यशवंत गायकवाड, अध्यक्ष, म अं.नि.स., जिल्हा रायगड, उल्हास ठाकूर, राज्य सहकार्यवाह, म अं.नि.स., महाराष्ट्र राज्य, आरती नाईक, राज्य सहकार्यवाह, म अं.नि.स., महाराष्ट्र राज्य, तुकाराम शिंदे, राज्य सहकार्यवाह, म अं.नि.स., महाराष्ट्र राज्य, निर्मला फुलगावकर, उपाध्यक्ष, म अं.नि.स., जिल्हा रायगड, महेंद्र नाईक, प्रधान सचिव, म अं.नि.स., जिल्हा रायगड  निलेश घरत, प्रधान सचिव, म अं.नि.स., जिल्हा रायगड, शुभांगी जोगळेकर, अध्यक्ष, म अं.नि.स., शाखा अलिबाग   महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा रायगड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
 

Web Title: In response to intolerance and insecurity, Maharashtra Anees' 'answer two' movement