esakal | दुर्गम भागात नॉटरिचेबल पण बिवलीतील शिक्षकांचे कामच भारी
sakal

बोलून बातमी शोधा

Review of Education Offline Teaching by Waghmode  Zilla Parishad teachers imparting knowledge  students through home visits

ऑफलाइन शिकवणीबाबत शिक्षणाधिकारी वाघमोडे यांच्याकडून आढावा सुरू आहे.

दुर्गम भागात नॉटरिचेबल पण बिवलीतील शिक्षकांचे कामच भारी

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : नॉटरिचेबल असलेल्या गावातही जिल्हा परिषदेचे शिक्षक गृहभेटीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहेत. लांजा तालुक्यातील बिवली येथील 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांचा जुलै, ऑगस्टचा पाठ पूर्ण करण्यात शिक्षकांना यश आले आहे. तेथील शिक्षकांच्या या कामाची उलटतपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी स्वतः केली. त्यांनी प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित अभ्यासक्रम सुरू असल्याचा अनुभवही घेतला.


कोविडमुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला असला तरीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेने सातत्याने आढावा घेताना शिक्षकांशी वारंवार संवाद साधला आहे. अनेक शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहेत. मोबाईलला रेंज नसलेल्या गावांत शिक्षकांची सत्त्वपरीक्षा होती.अँड्रॉईड मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी अनेक शिक्षकांनी गावात जाऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शिकवणी सुरू ठेवली आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी ( 8) शिक्षणाधिकारी वाघमोडेंना आला.

हेही वाचा- परीक्षा विभागाने कंबर कसली ;  पेपर तपासणीसाठी सॉफ्टवेअरचा शोध


बिवलीत कोणत्याच मोबाईला रेंज नाही. 1 ते 7वीचे वर्ग असलेल्या बिवली जिल्हा परिषद शाळेचा पट 34 आहे. तेथील मुख्याध्यापक लोबो फ्रान्सिस, रंगनाथ सरपोतदार, श्रेया विश्‍वासराव, सुशील पवार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आठवड्यातून दोन दिवस त्यांचे पाठ घेतात. पुढील आठवडाभराचा गृहपाठ देऊन आधीच्या अभ्यासाची तपासणी केली जाते. एखाद्या मोठ्या घरात चार किंवा पाच विद्यार्थ्यांना बोलावून शिकवणी घेतली जाते.


ऑफलाइन शिकवणीबाबत शिक्षणाधिकारी वाघमोडे यांच्याकडून आढावा सुरू आहे. बिवलीच्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर शिकवणी योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या भेटीवेळी उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, विस्तार अधिकारी राजेंद्र आंधळे, रवींद्र कांबळे, दत्तात्रय सोपनूर, विजय बंडगर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- ढगफुटी सदृशने पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात भरली धडकी

बिवलीतील शिक्षकांचे काम निश्‍चित वाखाणण्याजोगे आहे. इतर शिक्षकांसाठी हा आदर्श आहे. याप्रमाणेच दुर्गम भागातील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही या दृष्टीने नियोजन केले पाहिजे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे