...अन् वाहनचालकच झाले आंदोलनात सहभागी, वाचा सविस्तर

अजय सावंत
Tuesday, 18 August 2020

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजपाचे मंडळ अध्यक्ष विनायक राणे, पंचायत समितीचे सदस्य संदेश नाईक यांनी केले.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थीनंतर कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्त्याचे काम पूर्णपणे नव्याने न झाल्यास "चक्का जाम' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिला. आज भाजपतर्फे ग्रामस्थ व वाहनचालकांतर्फे नेरूरपार येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी हा इशारा दिला. 

वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोरोनाचा शिरकाव 

कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 16 ऑगस्टची डेडलाईन दिली होती. त्यामुळे आज भाजप, ग्रामस्थ व वाहनचालकांच्यावतीने नेरूरपार येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजपाचे मंडळ अध्यक्ष विनायक राणे, पंचायत समितीचे सदस्य संदेश नाईक यांनी केले.

यावेळी देवेंद्र नाईक, राकेश कांदे, निलेश साळसकर, अजय आकेरकर, देविदास नाईक, मयुर पिंगुळकर, सत्यविजय कदम आदी उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील यांनी भेट दिली. कोणत्याही परिस्थितीत या रस्त्यावरील सर्व खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी पावसाळी डांबराने भरावेत, तसेच पावसाळा संपताच या रस्त्याचे काम पूर्णपणे नव्याने करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा - माजी खासदार नीलेश राणे यांना कोरोनाची लागण : संपर्कातील व्यक्तीना स्वॅब टेस्ट करण्याचे केले आवाहन

दोन वर्षे या भागातील लोकप्रतिनिधी हा रस्ता मंजूर आहे, असे जनतेला सांगत आहेत; मात्र प्रत्यक्षात माहिती घेतली असता या रस्त्याची निविदा प्रक्रियाही झालेली नाही, राज्य शासनाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. 

लोकांच्या संतप्त भावना 
या रस्त्यावर तीन वर्षांत दुरुस्तीसाठी 50 लाखांचा निधी खर्च झाला आहे; परंतु रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. यामुळे लोकांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या. वाहनांच्या रांगा लागून देखील वाहनचालक यांनी कोणतीही तक्रार न करता स्वतः या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार असे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. चतुर्थीनंतर या रस्त्याचे काम पूर्णपणे नव्याने न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा श्री. देसाई यांनी दिला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road issue agitation in kudal sindhudurg district