esakal | महाळुंगेत रस्त्याला तडे; कुटुंबांचे स्थलांतर,‘सर्वेक्षण’ला सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगेत रस्त्याला तडे; कुटुंबांचे स्थलांतर

महाळुंगेत रस्त्याला तडे; कुटुंबांचे स्थलांतर

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील महाळुंगे (Mahalunge)मधलीवाडी येथे सुमारे पाचशे मीटरच्या परिसरामध्ये गत आठवड्यामध्ये जमीन खचल्याचा प्रकार घडला आहे तर, रस्त्यालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये त्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असून त्या परिसराचे सर्व्हेक्षण करण्याची सूचना भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale)यांनी दिली. मधलीवाडी परिसरातील अन्य चार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(Roadblocks In Mahalunge Rajapur Migration of Families)

गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील महाळुंगे मधलीवाडी येथे भूस्खल होऊन रस्ता खचल्याचा प्रकार घडला. या रस्त्याशेजारी असलेले संतोष माळगवे यांच्या घराला तडे जाऊन घराची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे माळगवे कुटुंबीयांना तातडीने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील अन्य ग्रामस्थ मुळम यांच्या घरासमोर उजवीकडे २०० फूट व डावीकडे ५०० फूट लांब अशी जमिनीला भेग पडली आहे. ही भेग त्या परिसरातील विनोद काशिनाथ मेस्त्री, विजय भास्कर मेस्त्री आणि पांडुरंग गोपीनाथ मेस्त्री यांच्या घरामागून गेली असून त्यामुळे त्यांच्या घरांनाही भविष्यामध्ये धोका पोहचण्याची शक्यता आहे. या रस्त्याला अन्य ठिकाणाही भेगा पडल्या आहेत. या भूस्खलनाची पाहणी तहसीलदार वराळे यांनी केली. त्यामुळे या परिसराचे सर्व्हेक्षण करण्याची सूचना दिल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.

हेही वाचा: गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम

भूस्खलनावेळी जमिनीला पडलेली भेग...

जमीन खचलेल्या रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले असून, त्याचा सूचना फलक लावण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली आहे. भूस्खलनाच्यावेळी जमिनीला पडलेली भेग ज्या घरांच्या जवळून गेली आहे, त्या संभाव्य धोकादायक घरातील कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्या वेळीही धोक्यामुळे केली होती सूचना

दरम्यान, याच ठिकाणी सुमारे २० वर्षांपूर्वी भूस्खलन झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. त्या परिसरातील काही घरांना धोका पोचण्याच्या शक्यतेने स्थलांतर करण्याची सूचना प्रशासनाने केली होती, अशी आठवण ग्रामस्थांनी तहसीलदारांना सांगितली.

एक नजर..

भूस्खलन होऊन रस्ता खचल्याचा प्रकार

अन्य काही ग्रामस्थांच्या घरांना धोका

त्या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला निर्बंध

सूचनाफलक लावण्याची ग्रामपंचायतीला सूचना

संतोष माळगवे यांच्या घराची तहसीलदार प्रतिभा वराळंेकडून पाहणी

माळगवे कुटुंबीयांचे तातडीने केले सुरक्षितस्थळी स्थलांतर

loading image