कातळशिल्प संवर्धनाला सुरवातीलाच ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

राजापूर - तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कातळशिल्पांना पर्यटनवाढीसाठी साज देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना आरंभीच खीळ बसत आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमातून कातळशिल्पांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करतानाच त्याबाबत माहिती देणारे फलकांसाठी आराखडाही तयार करण्यात आला. मात्र, संबंधित जमीनमालकांची संमती घेतली नसल्याने निधी असूनही हा आराखडा धूळ खात आहे. 

सुधीर रिसबूड, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई, धनंजय मराठे आदी पक्षिमित्रांनी राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सुमारे पाचशेहून अधिक विविध वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प आढळली आहेत. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमातून उपलब्ध झालेल्या निधीतून तालुक्‍यातील भालावली, देवीहसोळ, साखर, वाडापेठ आणि गोवळ या पाच गावांतील कातळशिल्पांच्या येथे जाण्यासाठी रस्ता वा पाखाडी, सौरपथदीप, माहिती फलक, रस्ते दिशादर्शक फलक आणि त्या कातळशिल्पाला सेलम स्टीलचे कुंपण आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या कामांचा सुमारे दहा लाखांचा आराखडाही तयार केला आहे. निधीही उपलब्ध आहे. मात्र, ही कातळशिल्प खासगी जागेमध्ये असल्याने त्या जागांच्या ठिकाणी काम करताना अडथळे येत आहेत. कातळशिल्प असलेल्या जागेमध्ये काम करण्यासाठी त्या जमीनमालकांचे बक्षीसपत्र वा संमतीपत्र असणे गरजेचे आहे. यासंबंधी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने ज्या-ज्या गावातील कातळशिल्पांच्या ठिकाणी कामे करावयाची आहेत, त्या ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करून संबंधित जागामालकांची संमतीपत्र वा बक्षीसपत्र करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, ती अद्यापही उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे सुरवातीलाच याला खो बसला आहे.

Web Title: Rock sculpture conservation