आरपीआय आठवले गटाचा स्वाभिमानला पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

"गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने आमची बोळवण नव्हे, तर फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेना सोबतची युती आम्ही तोडत आहोत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देत आहोत"

कणकवली - गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने आमची बोळवण नव्हे, तर फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेना सोबतची युती आम्ही तोडत आहोत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देत आहोत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी आज जाहीर केले. 

जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपने शिवसेनेचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण भाजपचेच समर्थन करीत असल्याचे व भाजप आपला मित्र असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेच्या दृष्टीने बेरजेची गणिते जुळवण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकनच्या जिल्हाध्यक्षांनी सिंधुदुर्गात स्वाभिमानला पाठिंबा जाहीर केला आहे. 

जिल्हाध्यक्ष कदम यांनी पत्रकात म्हटले की, युतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी केवळ निवडणुकीपुरतेच आमच्याशी संबंध ठेवले. आरपीआय कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर करून घेतला. सत्तेत केव्हाच सहभागी करून घेतले नाही. तालुकापातळीवरील युतीमध्येही आरपीआयला कधी विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे निवडणुकीपुरती युती करणाऱ्या भाजप शिवसेना पक्षांशी आम्ही कदापी युती करून लाचारी पत्करणार नाही. तसेच जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देत आहोत, असे कदम यांनी जाहीर केले. 

प्रश्‍न मांडूनही सुटले नाहीत 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी जीवरक्षक कामगारांच्या पगार वाढीबाबत आरपीआयने मंत्रालयात निवेदने दिली. त्यांचे प्रश्‍न अद्यापही सुटलेले नाहीत. जिल्ह्यातील मागासवर्गीयांचे अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. युतीच्या सर्वच नेत्यांनी या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आरपीआयने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI support Swabhiman in Sindhudurg