शिक्षकांसाठी आरटीपीसीआर चाचणीची सक्ती मागे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

रत्नागिरी जिल्ह्यात 458 माध्यमिक व उच्चमध्यमिक शाळा असून 83 हजार 136 विद्यार्थी नववी ते 12 पर्यंत शिक्षण घेत आहेत

दाभोळ : राज्य शासनाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सक्ती केली होती. मात्र आता हा निर्णय बदलला असून ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुर्धर आजार असतील त्यांनीच आरटीपीसीआर चाचणी करावयाची आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट करून या चाचणी करायची आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात 458 माध्यमिक व उच्चमध्यमिक शाळा असून 83 हजार 136 विद्यार्थी नववी ते 12 पर्यंत शिक्षण घेत आहेत. 5 हजार 890 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत, तर दापोली तालुक्यात 58 शाळांमध्ये 8 हजार 351 विद्यार्थी शिकत आहेत. 575 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्यात योग्य तो समन्वय नाही. रोज आदेशामध्ये बदल होत आहेत. कालपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक होते. पण त्यासाठी राज्य स्तरावर असणारी किटची अनुपलब्धता, रत्नागिरीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज 200 नमुने तपासण्याची असणारी सुविधा तर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 6 हजाराच्या आसपास, त्यामुळे आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी सुमारे 30 दिवस लागले असते. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीची सक्ती मागे घेण्याचा आदेश आज शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी काढला असून ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुर्धर आजार आहेत त्यांनीच केवळ आरटीपीसीआर चाचणी करावयाची आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट करून त्याचा रिपोर्ट शाळेत हजर होताना सादर करावयाचा आहे. 

हे पण वाचा हृदयद्रावक : केवळ उपचार न मिळाल्याने मातेसह बाळाचा मृत्यू

दापोली तालुक्यात दरदिवशी केवळ 40 टेस्ट केल्या जाणार असून सकाळी 20 व संध्याकाळी 20 अशा टेस्ट केल्या जाणार असल्याने दापोलीतील कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पूर्ण होण्यास किमान 15 दिवस लागणार असल्याने 23 नोव्हेंबर रोजीचा शाळा सुरू होण्याचा मुहूर्त टळणार आहे. दापोली नगरपंचायतीच्या केळसकर नाका येथील इमारतीत कालपासून या टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली असून येथे टेस्ट करण्यासाठी आलेल्या शिक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांना त्यांची टेस्ट होईपर्यंत उभे राहावे लागत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RT PCR test order return for teachers