हृदयद्रावक : केवळ उपचार न मिळाल्याने मातेसह बाळाचा मृत्यू

केरबा जाधव
Thursday, 19 November 2020

उपचाराअभावी मृत्यू होण्याची येथील ही दुसरी घटना आहे.

धामोड  (जि. कोल्हापूर) : म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा (ता. राधानगरी )येथे प्रसुतीवेळी मातेसह नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. भागुबाई राजाराम घुरके ( वय 26 ) असे तिचे नाव आहे. या महिलेवर वेळीच वैद्यकिय उपचार न झाल्यामुळे बाळ व मातेला जीव गमवावा लागला. गुरुवारी ( ता. 19 ) सकाळी सहा वाजता ही घटना घडली. उपचाराअभावी मृत्यू होण्याची येथील ही दुसरी घटना आहे.

हे धनगरवाडे मुख्य रस्त्यापासून सुमारे सात किलोमीटर डोंगरात आहेत. येथे जाण्यासाठी फक्त पायवाट आहे. बुधवारी ( ता. 18 ) रात्री 2 वाजता भागुबाई यांना प्रसववेदना सुरु झाल्या. त्यामुळे लोकांनी त्यांना बाजल्यावरुन पक्क्या रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच प्रसुती होणार असलेने त्यांनी त्या महिलेला पुन्हा घरी नेले. तीची प्रसुती झाली. मात्र उपचार वेळेत न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामध्येच मातेचा व बाळाचा मृत्यू झाला. राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी श्री. राजेंद्र कुमार शेटे व प्राथमिक आरोग्य केंद्र धामोडच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
 
तीन महिन्यापूर्वी सुनील गंगाराम घुरके या 11 वर्षाच्या मुलाचा रूग्णालयात वेळेवर पोहोचता न मिळाल्याने सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आज भागूबाई आणि बाळाचा मृत्यू झाला. येथील उपचाराअभावी घडलेली तीन महिन्यातील मृत्यूची ही दुसरी घटना आहे.

हे पण वाचावीज बिले माफ करा, सक्तीने जोडणी तोडू नका ; आंदोलनाचा इशारा

 
मुख्य रस्ता नाही
येथे अद्याप ही मुख्य रस्ता नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात आहे. प्रशासन आणखी किती बळी घेणार? असा सवाल येथील विकास मलगुंडे यांनी केला.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a baby with its mother due to lack of treatment in kolhapur