
एका व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली
दाभोळ (रत्नागिरी) : एका महिलेने 93 लाख रुपये किंमत होईल, एवढी रोकड पौंडात कुरियरने पाठवली आहे. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली असून दापोली पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी 20 मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सऍपवर एक पार्सल पाठविले आहे, असा मेसेज केला, पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सऍपवर टाकले. त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे, त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व एक लाख पौंड (93 लाख रुपये) आहेत, त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बॅंक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती, ही कागदपत्रे खरी असतील असे गृहीत धरून खोत यांनी मागणीनुसार बॅंकेत पैसे भरले.
हेही वाचा - आजी - माजी आमदारांवरच आघाडीचा निर्णय -
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत याना दोन एटीएम कार्डही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी 2 वेळा पैसेही काढले, या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल 30 लाख 73 हजार 100 रुपये या व्यक्तींनी ई-मेल मध्ये दिलेल्या बॅंक खात्यात भरणा केले. त्यानंतर खोत यांना कुरियर काही आले नाही, त्यामुळे आपण फसले गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलिस ठाणे गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांचे विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.
प्रलोभनाला बळी पडू नये
फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशल मीडियातून फसवणुकीचे प्रकार घडत असून या लोकांच्या प्रलोभनाला बळी पडून अनेक व्यक्ती आयुष्यभराची जमवलेली पुंजी पणाला लावत असून त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठा धक्का बसतो. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - कॉंग्रेसचे दिग्गज नेते आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी
संपादन - स्नेहल कदम