रानमेवा पिकला ; आस्वादक स्वाद जिभेवर लागला रेंगाळू ...

सचिन माळी
मंगळवार, 26 मे 2020


रानमेवा पिकला; वृक्षतोड, वणवे मुळावर; संवर्धनाची गरज 

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगरदऱ्यातून रानमेवा पिकला असून त्याचा आस्वादक स्वाद जिभेवर रेंगाळू लागला आहे. डोंगराची काळी मैना, आंबे, कोकम, फणस, अटूर्ली, अळू तयार झाली असून माणसांसह पशु पक्षांना त्याची मेजवानी चाखायला मिळत आहे. मात्र डेव्हलपमेंटच्या नावाखाली झालेली प्रचंड वृक्षतोडीने करवंदाच्या जाळी, कोकम, दुर्मिळ वनस्पती नामशेष होवू लागल्या आहेत.

 वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेत पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा कोकणात उपलब्ध होतो. जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. चिंच, आवळा, बोरे, कैरी आदी चवही काही न्यारीच. उन्हाळा सुरु झाल्याने जिभेवर चोचले पुरविणारा काही ठिकाणी दुर्मिळ होत चालला असताना देखील मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात बहरला आहे. चैत्र महिना सुरु झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते आंबट-गोड चवीच्या करवंदांचे. डोंगराच्या खुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात.

हेही वाचा- लालपरी आता चक्क मालवाहतुकीसाठी सज्ज : प्रवाशांच्या सेवेबरोबर शेतकरी, कारखानदारांच्या सेवेत एसटी -

डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा आस्वादक स्वाद​

या वृक्षाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. फुलांची गळती झाल्यावार हिरव्या रंगाचे करवंद बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करतात व तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असताना गर्मीत मनाला गारवा देणारी करवंद खायची संधी मिळते. करवंद हे बेरी वर्गीय फळ असून, त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिबंधांचे काम करतात.

हेही वाचा- हे' मुळनिवासी भारतीय सेलिब्रेटी कोरोना विरोधात उतरलेत मैदानात... -

करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर मात्र जास्त दिवस टिकतो. करवंदांच्या झाडांना प्रचंड प्रमाणात काटे असतात अशामध्ये कष्टपूर्वक काढलेल्या करवंदाना बाजारात कमी भाव मिळतो. शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेव्या व्यतिरिक्त करवंदाची चव काही औरच असते. मात्र काही वर्षांपासून या झाडांची कत्तल, गावागावात डोंगराळ भागातील होणारी कामे, लागणारे वणवे, आगी यासारख्या कारणामुळे रानमेव्याच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात 9 दिवसात कधी,किती, कसे सापडले कोरोना पाॅझिटिव्ह ? वाचा ग्राफिक्सच्या माध्यमातून... -

रोजगाराचे साधन मात्र कोरोना आडवा
 जंगलातील करवंद, कोकम, आंबे, अळू हा रानमेवा शहरी बाजारात विकून रोजगार निर्माण केला जातो. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा रोजगार हिरावला गेला असून त्यामुळे यावर उपजीविका असणाऱ्या कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पिकलेला आणि सुकवलेल्या रानमेव्याला शहरी भागात चांगली मागणी असते. यावर्षी मे महिना संपायला आला असून जंगलात रानमेवा सडून जातो आहे. तसेच तालुक्यात यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने हा रानमेवा आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असूनही दुर्लक्षित राहिला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rural areas of Mandangad taluka legumes are grown from the hills