देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार रखडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

देवरूख - वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक वाढणाऱ्या आजारांमुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून शहरातील आरोग्याच्या सुविधा अद्ययावत कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

देवरूख - वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक वाढणाऱ्या आजारांमुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून शहरातील आरोग्याच्या सुविधा अद्ययावत कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

चाळीस वर्षांपूर्वी देवरुखात उभ्या राहिलेल्या तेव्हाच्या आरोग्य उपकेंद्राचे आता देवरूख ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाले आहे. या रुग्णालयात सध्या २ वैद्यकीय अधिकारी व सुमारे २३ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्‍नही बिकट आहे. रुग्णालयाच्या आवारातच ११ कुटुंबांची राहण्याची सोय असली तरी एकूण कार्यरत कर्मचारी आणि उपलब्ध निवासस्थाने यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक जणांना भाड्याच्या खोलीत राहावे लागत आहे. 

ग्रामीण रुग्णालयात एक्‍स-रे सुविधा, लॅबोरेटरी, एड्‌स मोफत निदान केंद्र, शालेय आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा आदी सुविधा आहेत; मात्र जागेची उपलब्धता पाहता आणि दिवसागणिक वाढणाऱ्या योजना पाहता सध्याची इमारत पुरेशी नाही. औषध साठ्यालाही या ठिकाणी पुरेशी जागा नाही. जागेची अनुपलब्धता असतानाच येथे रक्‍तपेढी सुरू करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. 

प्रत्यक्षात या ठिकाणी जनरल वॉर्डच्या ३० खाटांना मंजुरी असून १० खाटांसाठी बांधकामच झालेले नाही. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे; मात्र त्यातच प्रसूती कक्षाचे काम चालविले जाते. रुग्णालयाच्या आजूबाजूला आता जागाच उपलब्ध नसल्याने आहे ती इमारत पाडून त्यावर नवी इमारत उभी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर होऊन खाटांचा बॅकलॉग आणि विविध विभागांसाठी आवश्‍यक स्वतंत्र जागा यामधून साधली जाणार होती. या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे कळू शकले नाही. आता या प्रस्तावाचा खर्च दोन कोटींच्या आसपास गेल्याचे सांगण्यात येते. आगामी काळात या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते नव्या प्रस्तावानुसार बांधले गेल्यास देवरूखसह संगमेश्‍वर तालुक्‍यातील हजारो रुग्णांची गैरसोय दूर होऊ शकेल. 

दोनदा नूतनीकरण...
देवरूखच्या आरोग्य सेवेची गरज लक्षात घेऊन तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद देवकर यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा बनविलेला आराखडा दोनदा नूतनीकरण करून पाठविण्यात आला. तरीही तो लाल फितीतच अडकला आहे.

Web Title: rural hospital development issue