ग्रामिण रूग्णालये प्रभारींच्या हाती, यंत्रणा कमकुवत 

विनोद दळवी 
Saturday, 21 November 2020

दोडामार्ग, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले आणि पेंडूर-कट्टा या ग्रामीण रुग्णालयात शासनाने वैद्यकीय अधीक्षक हे प्रमुख पद पुरविलेले नाही. त्यामुळे येथील कारभार प्रभारी हाकत आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - कुडाळ, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी, मालवण या पाच तालुक्‍याच्या ठिकाणी तर मालवण तालुक्‍यातील पेंडूर-कट्ठा येथे मिळून जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. यातील दोडामार्ग आणि वेंगुर्ले संस्थेत सर्वाधिक 10 आणि 9 अशी अनुक्रमे पदे रिक्त आहेत. तर दोडामार्ग, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले आणि पेंडूर-कट्टा या ग्रामीण रुग्णालयात शासनाने वैद्यकीय अधीक्षक हे प्रमुख पद पुरविलेले नाही. त्यामुळे येथील कारभार प्रभारी हाकत आहेत. परिणामी या संस्थांना आरोग्य सुविधा पुरविताना मर्यादा येत आहेत. 

जिल्हा रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालये याप्रमाणे जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामध्ये कुडाळ ग्रामीण रुग्णालयात 4, देवगड 7, दोडामार्ग 10, वैभववाडी 2, मालवण 6, वेंगुर्ले 9 आणि पेंडूर-कट्टा 7, अशी पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कारभारी, औषध निर्माता, लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉर्ड बॉय अशा पदांचा समावेश आहे. 

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात 28 पदे मंजूर असून त्यातील 24 पदे भरलेली आहेत. 4 पदे रिक्त आहेत. यामध्ये एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, दोन बोर्ड बॉय. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये 27 पैकी 20 पदे भरलेली आहे. तर 7 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांत एक वैद्यकीय अधिकारी, एक क्ष किरण तंत्रज्ञ, एक कारभारी, एक औषध निर्माता, एक कनिष्ठ लिपिक, एक वाहन चालक, एक शिपाई या पदांचा समावेश आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात 25 मंजूर पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. 23 पदे भरलेली आहेत. रिक्त पदांत वैद्यकीय अधीक्षक आणि शिपाई या पदाचा समावेश आहे. 

मालवण ग्रामीण रुग्णालयात 26 पदे मंजूर आहेत. यातील 20 पदे भरण्यात आली आहेत. 6 पदे रिक्त आहेत. यातील रुग्णालयाचे प्रमुख असलेले वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. त्याच बरोबर एक कारभारी, एक लिपिक, एक कनिष्ठ लिपिक, एक वाहन चालक, एक शिपाई, एक वॉर्ड बॉय, एक सफाईगार अशी एकूण सात पदे रिक्त आहेत. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 25 पदे मंजूर आहेत. यातील 16 पदे भरलेली तर 9 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षक हे प्रमुख पद रिक्त आहेच. त्याच बरोबर एक कारभारी, एक लिपिक, एक कनिष्ठ लिपिक, एक शिपाई, एक बोर्ड बॉय, एक सफाईगार अशा पदांचा समावेश आहे. 

...तर उपकप्तानच नाही 
पेंडूर-कट्टा या ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाने एकूण 27 पदे मंजूर केली आहे. त्यातील 20 पदे भरलेली असून 7 पदे रिक्त आहेत. यात प्रमुख वैद्यकीय अधीक्षक या पदाचा समावेश आहे. त्याच बरोबर 3 पैकी दोन वैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त आहेत. तीच स्थिती दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आहे. येथीलही वैद्यकीय अधीक्षक या पदांसह 3 पैकी 2 वैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त आहेत. याशिवाय दोडामार्गमध्ये एक क्ष किरण, एक कारभारी, एक कनिष्ठ लिपिक, एक वाहन चालक, तीन बोर्ड बॉय पदे रिक्त आहेत. तर पेंडूर-कट्टामध्ये एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ, एक कनिष्ठ लिपिक, एक वाहन चालक, एक सफाईगार ही पदे रिक्त आहेत. दोडामार्गमध्ये सर्वाधिक 10 पदे रिक्त आहेत. 

 

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाबाबत सातत्याने जिल्हा परिषद स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत आवाज उठवत आलो आहे. येथे 25 पैकी तब्बल 9 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय अधीक्षक नाही. वैद्यकीय अधीक्षक मिळावे म्हणून सभेत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांच्या प्रतिनिधींना वारंवार जाब विचारला आहे; परंतु त्यांना काही फरक पडलेला नाही. हे रुग्णालय अधिकाधिक सक्षम होवून येथील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे; परंतु शासन याबाबत गंभीर नाही. 
- विष्णुदास कुबल, जिल्हा परिषद सदस्य  

 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural Hospital issue in Sindhudurg District