आमच्या पाल्यांना रशियात न्या; खारकिव्हमध्ये अडकलेल्या तिघांच्या पालकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

russia ukraine Take our children to Russia Demand from parents

आमच्या पाल्यांना रशियात न्या; खारकिव्हमध्ये अडकलेल्या तिघांच्या पालकांची मागणी

देवरुख : रशिया-युक्रेन युद्ध आज सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे. यात देवरुखमधील तीन विद्यार्थी अडकले आहेत. ते ज्या ठिकाणी आहेत, तिथून रशिया केवळ ४५ कि.मी. लांब असून भारतीय दूतावासही १६० कि.मी.वर आहे. त्यामुळे आमच्या पाल्यांना भारत सरकारने काहीही करून रशियामध्ये न्यावे, अशी मागणी त्या तिघांचे पालक राजा शिंदे, राजू नरोटे, विनोद कदम यांनी केली. यासाठीचे एक निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आले आहे.

देवरुखमधील जान्हवी उमाकांत (राजा) शिंदे, साक्षी प्रकाश (राजू) नरोटे आणि अद्वैत विनोद कदम हे तीन विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनच्या खारकिव्ह शहरात आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर या तिघांसह अन्य भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सैनिकांनी एका बंकरमध्ये नेऊन ठेवले आहे. गेले चार दिवस हे सगळे तिथेच आहेत. या सर्वांना तीन दिवस पुरेल एवढे अन्न आणि पाणी देण्यात आले असून, तिथे तापमान उणे असल्याने त्यांना भयानक थंडीचा सामना करावा लागत आहे. जवळ असलेल्या कपड्यावर हे विद्यार्थी उब घेत असून तिथे विद्युतपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. सुदैवाने सोशल मीडियाद्वारे हे विद्यार्थी आपल्या पालकांशी संपर्कात आहेत. कालपर्यंत राजधानी किव्हमध्ये सुरू असणारे बॉम्ब वर्षाव आता खारकिव्ह शहरावरही सुरू झाल्याने हे पालक चिंतातूर झाले आहेत. सद्य:स्थितीत युद्ध खारकिव्हमध्येच सुरू असून जरी रशियाने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली असली तरी तिथली युद्धजन्य स्थिती पाहता इथे सर्वजण ते सगळे सुरक्षित राहावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

याबाबतीत आज संध्याकाळी यातील पालक उमाकांत ऊर्फ राजा शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमची मुले जिथे अडकली आहेत, त्या ठिकाणाहून रशिया केवळ ४५ कि.मी.वर आहे, तर भारत सरकार हे रोमानियामधून भारतीय विद्यार्थी मायदेशी आणत असून, ते ठिकाण यांच्यापासून १२०० कि.मी.वर आहे.

आज सकाळपासून आमच्या जवळच्या परिसरात बॉम्बचा वर्षाव सुरू आहे. त्यामुळे आम्हाला बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. आम्ही सुरक्षित असलो तरी आता काळजी वाटू लागली आहे. जवळ केवळ ३ दिवसांचे अन्न आणि पाणी असून इथे थंडीही खूप आहे. भारत सरकारने आम्हाला मायदेशी सुखरूप आणावे.

- साक्षी नरोटे

Web Title: Russia Ukraine War Update Take Our Children To Russia Demand From Parents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top