esakal | सह्याद्रीच्या रांगातील वाघ दृश्‍य की अदृश्‍य?

बोलून बातमी शोधा

सह्याद्रीच्या रांगातील वाघ दृश्‍य की अदृश्‍य?
सह्याद्रीच्या रांगातील वाघ दृश्‍य की अदृश्‍य?
sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या रांगांमध्ये गायीची शिकार पट्टेरी वाघाने केल्याच्या वृत्तानंतर समाजमाध्यमांमध्ये वाघाचा ट्रॅप कॅमेऱ्याने काढलेला एक फोटो व्हायरल झाला. तो याच गायीच्या शिकारीशी संबंधित असल्याचा दावा केला गेला. स्थानिक वन विभागाने तो खोडून काढला; मात्र कोल्हापूर विभागाचे मुख्य वन संरक्षक क्‍लेमेंट बेन यांनी ट्विट करून सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचे वास्तव्य आढळल्याचा फोटो पोस्ट केला. यामुळे कोल्हापूर वन क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये पट्टेरी वाघ आल्याच्या सुखद वार्तेला पुष्टी मिळाली. अर्थात आतापर्यंत आंबोली ते मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात मिळालेल्या पाऊलखुणा, पाळीव जनावरांची शिकार, काही ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्यात मिळालेले पुरावे यांचा विचार करता वाघाचे वास्तव्य नाकारता येणार नाही; पण त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने फारसे काही होताना दिसत नाही. उलट वन विभाग वाघाचे अस्तित्व नाकारण्यासाठीच आपली ताकद लावताना दिसत आहे; मात्र आता या वाघाच्या अधिवास बळकटीसाठी आणि त्याच्या संवर्धन, संरक्षणासाठी ठोस पाउले उचलण्याची वेळ आली आहे.

काय घडले?

सिंधुदुर्ग हद्दीत सह्याद्री रांगांमध्ये गेल्या आठवड्यात गायीची शिकार झाली. शक्‍यतो गाय, बैल, म्हैस अशा प्राण्यांची केवळ पट्टेरी वाघच शिकार करतो. यामुळे येथे वाघाचा वावर असल्याचा दावा स्थानिकांनी केला. वन विभागाने या भागात कॅमेरे लावून याची खात्री केली जाईल असाही दावा केला. याला दोन दिवस उलटायच्या आतच समाजमाध्यमांमध्ये एक फोटो व्हायरल झाला. त्यात एक पट्टेरी वाघ आणि बाजूला शिकार झालेली गाय दिसत होती. स्थानिक वन विभागाने हा फोटो आपल्याकडचा नसल्याचे स्पष्ट केले. तसा त्या भागात कॅमेरा ट्रॅप लावलाच नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे; मात्र या निमित्ताने आंबोली ते मांगेली या व्याघ्र कॉरिडॉरमध्ये वाघाच्या वास्तव्याबाबत पुन्हा पारंपरिक प्रश्‍न उभा राहिला. खरे तर वनशक्‍ती या संस्थेने या कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या म्हणण्याला अनुसरून बरेच पुरावेही दिले आहे. वन विभाग मात्र अजूनही उघडपणे सिंधुदुर्गातील वाघाचे अस्तित्व मानायला तयार नाही. वाघाचे शिकाऱ्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी हे धोरण असू शकते; मात्र वाघ असेल तर त्याच्या संरक्षणासाठी ठोस उपाय योजणेही गरजेचे आहे. दुर्दैवाने असे दृश्‍य उपाय दिसत नाहीत.

वाघाचे वास्तव्य आहे का?

आंबोली ते मांगेली या पट्ट्यात वाघाच्या वास्तव्याचे बरेच पुरावे गेल्या काही वर्षांत मिळाले आहेत. वन विभागाने वारंवार ते नाकारले. अर्थात २००९ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्या काळात वन विभागाने वाघाचे वास्तव्य अधिकृतरीत्या मान्य केले. पुढच्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र पुन्हा ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतली. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलीकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक वन्यप्राण्यांचा तेथे मुक्‍तपणे अधिवास आढळतो. दोडामार्ग तालुक्‍यातील जंगल परिसरात मध्यंतरी वन विभागाने खासगी कंपनीच्या माध्यमातून लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये दोन वाघ ट्रॅप झाले होते. त्यातील एक मादी होती. त्यामुळे दोडामार्ग तालुक्‍यात वाघांचे अस्तित्व अनेक वर्षांपासून आहे यावर शिक्‍कामोर्तब झाले होते. महाराष्ट्र-गोवा सीमेवर विर्डी गाव आहे. अर्धा विर्डी गाव गोव्यात तर अर्धा महाराष्ट्रात येतो. विर्डी परिसरात निबीड अरण्य आहे. तेथे वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात पिल्लासह वाघिणीचे दर्शन घडले होते. चौकुळ-आंबोली यासह या पूर्ण पट्ट्यात अनेकदा गायी, म्हशी आदींची शिकार झाल्याचे प्रकार घडले. वनविभागाने वाघाचा हल्ला असल्याचे मान्य करून त्यांना भरपाईही दिली. बऱ्याचठिकाणी वाघाच्या पाऊलखुणाही दिसल्या.

येतो कोठून?

सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगात फिरणारा हा वाघ येथेच मुक्‍कामाला असतो का? या प्रश्‍नाचे उत्तर परिपूर्ण अभ्यासाशिवाय मिळणे कठीण आहे. सर्वसाधारणपणे वाघ आपली टेरिटरी तयार करतो. एका टेरिटरीत एकच नर वाघ असतो. एखाद्या ठिकाणी नवा तरुण वाघ तयार झाला तर तेथे असलेला प्रस्थापित वाघ त्याला बाहेर ढकलतो. मग तो नव्या टेरिटरीच्या शोधात बाहेर पडतो. जंगल गोलाकार असल्यास तो चारही दिशांना जाऊ शकतो; मात्र सह्याद्री रांगांसारखी चिंचोळी पट्टी असेल तर त्याला स्थलांतरासाठी दोनच दिशा शिल्लक राहतात. मांगेली ते आंबोली या भागाचा विचार केला तर एका बाजूला राधानगरी, दाजीपूरचे अभयारण्य तर दुसरीकडे कर्नाटकातील दांडेली आणि गोव्यातील इतर छोट्या अभयारण्यांचा शेजार आहे. या दोन्ही ठिकाणावरून वाघ येऊ शकतात. साधारणपणे दांडेली (कर्नाटक) - उत्तर गोव्यातील म्हादई अभयारण्य - तिलारी - राधानगरी - विशाळगड - जोरजांभळी - महाबळेश्‍वर असा मोठा वाघाचा भ्रमणमार्ग असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासावरून पुढे आले आहे. यात सिंधुदुर्गातील आंबोली ते मांगेली या कॉरीडॉरचा महत्त्वाचा वाटा आहे. नव्या टेरीटरीच्या शोधातील वाघ साधारणपणे निवासासाठी योग्य जंगल अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षितता याचा विचार करतो. यासाठीही सिंधुदुर्गात वाघ येत असावा. दुसरी शक्‍यता म्हणजे लगतच्या दोन्ही अभयारण्यात वाघ आहेत. ते भक्ष्यासाठी या भागात येत असावेत. तिसरी शक्‍यता म्हणजे या सह्याद्री रांगांमध्ये वाघ अधिवास निर्माण करून राहत असावा. अर्थात या प्रश्‍नांची उत्तरे वन विभागाच्या अभ्यासातूनच पुढे येऊ शकतात.

संरक्षणाचे काय?

कोकणातील वन विभाग आतापर्यंत शक्‍यतो वाघाचे अस्तित्व नाकारण्यासाठीच आटापिटा करताना दिसून आला आहे; मात्र वाघाचे वास्तव्य असेल तर त्याच्या संवर्धनाची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे आहे. मध्यंतरी गोव्यातील जंगलात विषप्रयोगामुळे वाघाचे अख्खे कुटुंब उद्‌ध्वस्त झाल्याचे उदाहरण ताजे आहे. वन्य प्राण्यांच्या संवर्धन किंवा ट्रॅकिंगच्या बाबतीत विदर्भामध्ये बऱ्यापैकी सिस्टीम आहे. तेथे अभयारण्य असल्यामुळे वाघ व इतर दुर्मिळ प्राण्यांच्या संरक्षणासाठी यंत्रणा सज्ज असते. सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीत अशी सिस्टीम नाही. शिवाय पश्‍चिम घाटात मालकी हक्‍काच्या जंगलाची संख्या जास्त आहे. चिंचोळी पट्टी असल्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे कठिण होते. शिवाय वाघ कितीही दुर्मिळ असला तरी सहसा तो कोणालाच नको असतो. अगदी वन विभागाच्या यंत्रणेलाही. कारण तो आहे म्हटला की त्याच्या संवर्धनाची जबाबदारी येते. त्यामुळे निर्माण होणारी स्थिती आणखी गंभीर असते. दुर्दैवाने कोकणात हिच मानसिकता आहे. यामुळे अस्तित्वात असलेल्या वाघाच्या संवर्धनासाठी फारसे दृश्‍य उपाय योजले जाताना दिसत नाहीत.

कॉरिडॉर धोक्‍यात

आंबोली ते मांगेली या वाघाच्या कॉरिडॉरसह त्याच्या पट्ट्यातील दहा किलोमीटर क्षेत्रातील गावे पर्यावर संवेदनशील क्षेत्रात घेणे आवश्‍यक होते. वनशक्ती संस्थेतर्फे स्टॅलीन दयानंद यांनी उच्च न्यायालयात त्यासाठी २०११ मध्ये याचिका दाखल केली आहे. संबंधित क्षेत्र संरक्षित करण्याच्या दृष्टिने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातील वृक्षतोडीवर बंदी घातली होती; मात्र २०१३ पासून या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे वाघाचा कॉरिडॉर धोक्‍यात आला आहे.

वाचविण्याची गरज

महाराष्ट्रात वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. पर्यावरणप्रेमींसाठी ती समाधानाची बाब असली तरी वाघांची वाढते मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे वाघांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होण्याची गरज आहे. वाढती वृक्षतोड, शिकारी आणि तस्करांचा जंगलभागातील वाढता वावर, तस्करीसाठी उपलब्ध बाजारपेठा आणि वाढती अवयव तस्करी यावर प्रयत्नपूर्वक आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातही वाघाच्या अस्तित्वाचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या संवर्धनासाठी पाउले उचलण्याची गरज आहे.

ट्रॅप कॅमेऱ्याचे वास्तव

वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरा वापरावा की नको याबाबत दोन मतप्रवाह आहे. प्रामुख्याने हा कॅमेरा परदेशात गेम रिझर्व्ह क्षेत्रात शिकार निश्‍चितीसाठी वापरला जातो. तेथे एखाद्या प्राण्याची शिकार करण्याचा छंद असणाऱ्या लोकांकडून पैसे घेतले जातात. त्याच्या बदल्यात शिकार करण्याची मुभा दिली जाते. मग तो प्राणी कोठे आहे, हे शोधायला हे कॅमेरे मदत करतात. ४५ डिग्रीमध्ये एखादी गोष्ट हलली की हा कॅमेरा आपोआप ॲक्‍टिव्ह होऊन फोटो टिपतो. भारतात वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी, त्यांचे वास्तव्य समजावे म्हणून प्रामुख्याने वन विभाग किंवा वन विभागाच्या परवानगीने अभ्यासक संस्था याचा वापर करतात. अर्थात यातून मिळणाऱ्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील व्याघ्र

अभ्यासकांच्या मते...

  • वाघ भक्ष्याच्या शोधात फिरत राहतो. आता आंबोलीत दिसलेला वाघ चार दिवसांनी मांगेलीतही दिसू शकतो.

  • वाघाच्या पंजाचा आकार गोल तर वाघिणीच्या पंजाचा आकार लांब दिसतो. शिवाय पंजाच्या उंचवट्यावरून नर-मादी ओळखता येतात.

  • आंबोली ते मांगेली या पट्ट्यात अनेकदा पट्टेरी वाघाचे स्थानिकांना दर्शन

  • वाघाच्या वावराचे नेमके ठिकाण कळले तर परप्रांतातील शिकाऱ्यांकडून वाघाची शिकार होण्याची भीती असते. वाघाची शिकार आणि तस्करी करणारी टोळी नेहमीच त्यादृष्टीने कार्यरत असते. त्यामुळे वन विभागाकडून वाघाच्या वावराचे नेमके ठिकाण सांगण्याबाबत असमर्थता दर्शवली जाते.

व्हायरल फोटोचे वास्तव काय?

चार दिवसांपूर्वी समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या फोटोचे वास्तव काय? हा प्रश्‍न आहे. सिंधुदुर्गातील ज्या गावात गायीची शिकार झाली तेथेच हा वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाल्याचा दावा या पोस्टमधून केला गेला होता. स्थानिक वन विभागाने तो खोडला. वाघाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे लोकेशन गुप्त ठेवावे असे संकेत आहेत. त्यामुळे वन विभागाची भूमिका बरोबरही असू शकेल. अर्थात याच दरम्यान कोल्हापूर वनविभागाचे सीसीएफ क्‍लेमेंट बेन यांनी ट्विट करून नुकत्याच जाहीर झालेल्या एका कंझर्व्हेशन रिझर्व्हमध्ये वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाल्याचे म्हटले. हा फोटो आणि व्हायरल फोटो वेगळा असला तरी त्यात दिसणारी शिकार आणि परिसर सारखाच वाटतो. त्यामुळे कोल्हापूर वन कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचे वास्तव्य आढळल्याची शक्‍यता पूर्णतः नाकारता येणार नाही.

वाघ आला कोठून?

संबंधित वाघ सह्याद्री रांगांमध्ये असल्यास ती खूप मोठी सुखद घटना म्हणावी लागेल. कारण ५ जानेवारी २०२०ला म्हादई (गोवा) अभयारण्यात वाघाच्या संवर्धनाच्या दृष्टीने खूप मोठी दुर्घटना उघड झाली होती. तेथे काही स्थानिकांनी केलेल्या विषप्रयोगात चार वाघांचा मृत्यू झाल्याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला होता. यात एक मादी आणि दोन वाढलेल्या मोठ्या पिल्लांचा समावेश होता. हे वाघाचे कुटुंब सिंधुदुर्गातून जाणाऱ्या व्याघ्र कॉरीडॉरच्या क्षेत्रात होते. त्यानंतर या भागात वाघ उरला की नाही याबाबत साशंकता होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच कुटुंबातील हा वाघ असू शकतो. कारण या दुर्घटनेआधी गोव्याच्या वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये एकूण पाच वाघांचे वास्तव्य आढळले होते. त्यामुळे आता दिसलेला तो वाघ विषप्रयोगावेळी बचावलेला असू शकतो. या पाच वाघांचे एकत्र भ्रमण २०१५-१६ पासून वेळोवेळी वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये दिसले आहे. विषयप्रयोगाआधी मार्च २०१८ मध्ये चांदोलीत या कुटुंबाचे फोटो कॅमेराबध्द झाले होते. त्यानंतर २४ मार्च २०२१ ला म्हादईच्या अभयारण्यातून एक वाघ पुढे सरकत असल्याचे आढळले होते. कोकणात दिसलेला तो हाच वाघ असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव हे सिद्ध करणे कठीण आहे.

"विदर्भात अभयारण्य, विशिष्ट परिस्थितीमुळे वन्यजीव संरक्षणाची सिस्टीम आहे; पण कोकणात तशी नाही. सह्याद्री रांगांमध्ये वाघ दिसला असेल तर ती चांगली बातमी आहे. त्याच्या संरक्षणासाठी विशेष उपाय योजायला हवेत. त्यावर लक्ष ठेवणे, संरक्षण देणे याला प्राधान्य हवे. यासाठी टायगर प्रोटेक्‍शन फोर्स सारखे विशेष दल वरिष्ठ स्तरावरून तयार करायला हवे."

- संजय करकरे, व्याघ्र अभ्यासक

"सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचे निश्‍चितच वास्तव्य आहे. त्याचे प्रमाण कमी-जास्त असू शकेल; मात्र त्याला वाचवणे, संरक्षण करणे अत्यावश्‍यकच आहे. यासाठी त्याचा अधिवास वाचवायला आणि वाढवायला हवा. ही फक्‍त वन विभागाचीच नाही, तर सगळ्यांचीच जबाबदारी आहे."

- भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूण

"पट्टेरी वाघाच्या व्हायरल फोटोबाबत कल्पना नाही. तो फोटो आमच्या वन विभागाच्या कॅमेऱ्यातील नाही. सावंतवाडी वन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडील फोटो नसल्याचे सांगितले. सातारा किंवा इतर पुढच्या भागातील हा फोटो असावा; मात्र आंबोली भागातील हा वाघाचा फोटो नाही."

- दिगंबर जाधव, वनक्षेत्रपाल, आंबोली-वनक्षेत्र