‘सह्याद्री’ला पुन्हा पावसाने झोडपले; वादळामुळे मोठी हानी

आंबा, काजू पीक हातचे गेले, शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा
sindhudurg
sindhudurgSakal

वैभववाडी - जिल्ह्यात पाच-सहा दिवसांपासून वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी (ता १०) रात्री साडेआठच्या सुमारास वैभववाडी तालुक्यासह सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने झोडपून काढले. सतत पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आंबा उत्पादनाची आशा पूर्णतः मावळली असून, हातातोंडाशी आलेले पीकच वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. त्यातच अजूनही आंबा, काजू पीक नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे बागायतदारांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाच-सहा दिवस पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत हा पाऊस पडतो. सायंकाळच्या वेळेत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसतो. काल रात्रीही सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांना पावसाचा जोरदार तडाखा बसला.

वैभववाडी, करूळ, एडगाव, अरुळे, नावळे, सांगूळवाडी, सडुरे, शिराळे, खांबाळे, आर्चिणे, लोरे, कोकिसरे या गावांना पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. अंगावर शहारा येणारा विजांचा लखलखाट सुरू होता. त्यामुळे तासभर विजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, घोणसरी, लोरे या भागात देखील विजांच्या लखलखाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. सतत सहा ते सात दिवस पाऊस पडत असल्यामुळे पुर्वपट्टयातील आंबा उत्पादन मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात बहुतांशी झाडावरील फळे गळुन पडली होती; परंतु उर्वरित मोजकी फळे देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे खराब होणार आहेत. आंब्याप्रमाणे काजुपिकाचे देखील मोठे नुकसान पावसामुळे होत आहे. असे असूनही अजुनही कृषी विभागाकडून पंचनामा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. अनेक शेतकऱ्यांची झाडे मोडून पडली आहेत, तर काहीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

झाडच दुभंगले

खांबाळे दंड थांब्यानजीक एक मोठे आकेशियाचे झाड आहे. रस्त्यालगत असलेल्या या झाडावर काल रात्री वीज पडली. त्यामुळे हे झाड दुभंगले आहे. सुदैवाने वीज पडली त्यावेळी आजूबाजूला कुणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

कनेडी पंचक्रोशीलाही झोडपले

कनेडी ः येथील पंचक्रोशीमध्ये सातत्याने पाऊस कोसळत असून, रविवारी (ता.१०) रात्री पावसाने परिसराला चांगलेच झोडपून काढले. काही ठिकाणी पडझड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे, विजा चमकत होत्या. खंडित झालेला वीजप्रवाह रात्री उशिरा सुरळीत झाला. मात्र, काही भागांत अजूनही वीजपुरवठा खंडितच आहे. वादळी पावसाचा मोठा फटका सध्या सह्याद्री पट्ट्यातील विविध गावांना बसत आहे. पावसामुळे शेती आणि मशागतीची कामे रखडली आहेत.

मे महिना कोकणी मेव्याशिवायच

दरवर्षीच्या मे महिन्यात आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंदे, चारोळी यांसह विविध कोकणीमेवा उपलब्ध असायचा. त्यामुळे हा मेवा चाखण्यासाठी खासकरून चाकरमानी मे महिन्यात येतात; परंतु नुकत्याच झालेल्या पावसाचा सर्वच फळांवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना फळाविनाच जाण्याची शक्यता आहे.

नुकसानसत्र संपेना

वादळामुळे वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत मालमत्तांचे पाच ते सहा लाखांवर नुकसान झाले आहे. याशिवाय खांबाळे धनगरवाडी येथे झाड कोसळून एका बैलाचाही मृत्यू झाला आहे; परंतु या नुकसानीसोबत आंबा, काजूचे नुकसान हे कित्येक पट अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com