सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा : चौथ्या खेमसावंतांच्या कारकिर्दीची अखेर

चौथे खेमसावंत ऊर्फ बापूसाहेब यांची राजगादीची कारकिर्द ५६ वर्षांची होती.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणाSakal

भाग- ४५

चौथे खेमसावंत ऊर्फ बापूसाहेब यांची राजगादीची कारकिर्द ५६ वर्षांची होती. यातील १६ वर्षे त्यांनी स्वतंत्रपणे राज्य केले; मात्र त्यांच्याच कारकिर्दीत संस्थानवर ब्रिटिशांचा पूर्ण अमल बसला. त्यांनी धामधुमीच्या काळातही साधूसंतांना संस्थानात राजाश्रय दिला. त्यांच्या पश्‍चात चौथे फोंडसावंत अर्थात आनासाहेबांची अत्यंत अल्प अशी कारकिर्द सावंतवाडी संस्थानने पाहिली. या काळात कारभार ब्रिटिशांच्या हातात पूर्णवेळ होता. त्यांनी विविध सुधारणाही केल्या.

सावंतवाडी संस्थानमध्ये झालेले छोटे-मोठे ब्रिटिशांविरोधातील बंड चौथे खेमसावंत ऊर्फ बापूसाहेब यांच्याच कारकीर्दीत झाले. बापूसाहेब अगदी कमी वयात गादीचे मालक झाले; मात्र त्यांना स्वतंत्र कारभार अवघा १६ वर्षे करता आला. ब्रिटिशांविरूद्ध मोठे बंड थंडावल्यानंतर त्यांनी संस्थानच्या व्यवस्थेत बदल करण्याकडे लक्ष केंद्रीत केले. पोलिटीकल सुप्रिटेंडन्ट मेजर जेकब यांनी संस्थानातील ऐन जिनसी गल्ला वसूल करण्याची पद्धत बंद केली. त्याऐवजी रोखीने वसुली सुरू करण्यात आली. पिरखानी नाणे पूर्ण बंद करून कंपनीचे चलन वापरले जावू लागले. प्रत्येक खात्यातील काम नीट व्हावे म्हणून नियम घालून देण्यात आले. त्यांनी शिक्षण व्यवस्थेत बऱ्याच सुधारणा केल्या. ते स्वतःच्या कमाईतूनही हुशार विद्यार्थ्यांना बक्षिसे द्यायचे. त्यांनी एक मोठी रक्कम यासाठी ठेवली होती. त्याच्या व्याजातून स्कॉलरशीप, बक्षिसे दिली जात असत.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा
रोप वे तील धमाल सैर; भारतात अनेक ठिकाण प्रसिद्ध

१८५० मध्ये मेजर जेकब यांची कच्छ प्रांतात बढतीने बदली झाली. त्यांच्या जागी हेन्री लेकन अंडरसन हे पोलिटीकल सुप्रिटेंडन्ट म्हणून बदलून आले. त्यांनीही कारभारात बरेच बदल केले. पुढे १८५३ मध्ये त्यांची बदली होऊन जॉन विल्यम ऑल्ड हे नियुक्त झाले. त्यांनी १८५४ मध्ये पोष्टखात्याची जुनी पारंपारीक व्यवस्था मोडून भारतात इतर ठिकाणी सुरू असलेली नवी पोष्टव्यवस्था स्विकारली. यामुळे अर्ध्या आण्यात भारतात कुठेही पत्र पाठवता येवू लागली. पूर्वी ही रक्कम अंतरानुसार वाढत असे. त्यांची जानेवारी १८५९ मध्ये बदली होवून कॅप्टन फ्रेडरीक स्नायडर हे बढतीने सावंतवाडीचे पोलिटीकल सुप्रिटेंडन्ट बनले. ते दीर्घकाळ सावंतवाडीत विविध पदांवर कार्यरत होते. सेकंड इन कमांड पदावरून त्यांना ही बढती देण्यात आली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुधारणा केल्या.

संस्थानवर असलेल्या कर्जाचा बोजा कमी केला. नोकर-चाकरांचे पगार वाढवले. शिक्षणाला उत्तेजन दिले. इंग्रजी शिक्षण देण्यासाठी आणि मुलींना शिक्षण मिळण्यासाठी सावंतवाडीत शाळा सुरू केल्या. मुलांच्या शाळांची संख्याही वाढवली. त्याकाळात मोडी, बालबोध लिहिणे, वाचणे, नकाशा पाहणे, व्याकरण, गणित, सिध्दांत व त्रिकोणमिती असा अभ्यासक्रम असायचा. या सगळ्या घडामोडी घडत होत्या तेव्हा चौथे खेमसावंत अर्थात बापूसाहेब गादीवर होते. भिडस्थ स्वभावामुळे कावेबाज लोकांकडून ते फसले जात. ब्रिटिशांनी कारभार हातात घेतल्यापासून ते नियमित राजकारभारापासून हळूहळू दूर होत गेले. स्नानसंध्या, देवदर्शन, ईश्‍वर भक्ती यातच त्यांचा बराच वेळ जात असे. त्यांच्या कारकीर्दीत साधूसंतांना या संस्थानात आश्रय मिळाला. पूर्णदास उर्फ बाबा उसपकर आणि बालाजी बुवा हे दोन संत त्यांच्याच कारकीर्दीत नावारूपास आले. पूर्णदास हे गौड सारस्वत ब्राह्मण होते.

ते उसप येथे कुलकर्णी म्हणून काम करायचे. १८३८ मध्ये झालेल्या बंडावेळी ते आपल्या भावंडांसोबत केरी (गोवा) येथे गेले. ते लहानपणापासूनच धार्मिक होते. १८५८ मध्ये ते केरीमध्ये स्नान करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेले होते. तेथे एका सिद्ध पुरूषाने दर्शन देवून त्यांच्यावर अनुग्रह केला. पूर्णदास असे नाव देवून त्यांची समाधी लावून तो सिद्धपुरूष निघून गेला. तीन दिवसानंतर ते समाधी उतरवून घरी आले. पुढे भजन, पूजन, तिर्थयात्रा यातच ते लीन झाले. त्यांच्याबाबतच्या आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. त्यातील एका कथेनुसार भागवत लिहीण्यासाठी त्यांनी एका दुकानदारांकडून कागद आणले होते; पण ठरलेल्या वेळेत ते त्याचे पैसे देवू शकले नाही. यावेळी कुणब्याच्या वेशात येवून देवाने हे पैसे दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. हरमलमध्ये एका मृताला त्यांनी जिवंत केले, एका मरणासन्न व्यक्तीला तिर्थ देवून खडखडीत बरे केले, अशा आख्यायिकाही सांगितल्या जातात.

त्यांनी काही धार्मिक ग्रंथ, पदे लिहीली. त्यातील ज्ञानघन, स्वात्मानुभव हे प्रमुख ग्रंथ आहेत. काही काळानंतर ते केरी सोडून वेंगुर्ले येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी विठ्ठल-रूक्मिणीचे देवालय बांधले. १८७० मध्ये येथेच त्यांनी ९२ व्या वर्षी समाधी घेतली.

बालाजी बुवा हे नेमके कोठून आले हे सांगणे कठिण आहे. ते साताऱ्याहून आल्याचे काहींचे म्हणणे होते. ते अवलीया होते. त्यांच्याही चमत्काराच्या काही आख्यायीका प्रसिध्द आहेत. यातील एका आख्यायिकेनुसार एका रोगग्रस्त व्यक्तीने त्यांचे पाय धरले यावेळी पहारीने त्यांनी त्याच्या डोक्यावर वार केला. तो बेशुध्द पडला; मात्र शुध्दीवर आला तेव्हा तो रोगमुक्त झाला होता. ते नेहमी भिक्षा मागत फिरायचे आणि मिळालेली भिक्षा कोणालातरी देवून टाकायची असा त्यांचा दिनक्रम असायचा. बापूसाहेब महाराजांच्या पश्‍चात त्यांनी सावंतवाडीत समाधी घेतली. त्यांचा मठही आहे.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा
80 हजार रुपयांमध्ये तुम्ही या 5 देशांना फिरू शकता

धार्मिक प्रवृत्तीच्या बापूसाहेबांचे ११ ऑक्टोबर १८६७ ला निधन झाले. यावेळी ते ६२ वर्षांचे होते. ते ५६ वर्षे गादीचे मालक होते; पण अवघी १६ वर्षे त्यांना स्वतंत्र कारभार पाहता आला. त्यांना तीन बायका होत्या. पहिल्या लक्ष्मीबाई या पाटणकर घराण्यातील. त्यांच्यापासून त्यांना साहेबजी, युवराज आनासाहेब आणि बायामा अशी तीन मुले होती. यातील साहेबजी यांचा विवाह दादासाहेब घाटगे बुधकर झुंजारराव यांच्याशी तर बायामा यांचा नागोजीराव जांभुटकर यांच्याशी झाला.दुसऱ्या पत्नी सावित्रीबाई याही पाटणकर घराण्यातल्याच. त्यांना रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब हे एकच पुत्र होते. तिसऱ्या जानकीबाई या खानविलकर घराण्यातील. त्यांच्यापासून सोमसावंत ऊर्फ आबासाहेब आणि नारसावंत ऊर्फ बुवासाहेब असे दोन मुलगे होते.

इतकी होती संस्थानची लोकसंख्या

पोलिटीकल सुप्रिटेडन्ट म्हणून नियुक्तीनंतर अंडरसन यांनी १८५२ मध्ये सावंतवाडी संस्थानची पहिली जनगणना केली. याला खानेसुमारी असे म्हटले जात असे. त्याकाळात संस्थानची लोकवस्ती १ लाख ५० हजार ६५ इतकी होती. त्यात ११ हजार २४२ ब्राह्मण, १ लाख ३२ हजार ८७० इतर हिंदू, ३ हजार ८३५ मुस्लिम, १९५९ ख्रिश्‍चन, १५१ सिदी आणि ८ ज्यू होते.

आनासाहेबांची अल्प कारकिर्द

बापूसाहेबांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र आनासाहेब यांना १८६८ मध्ये ब्रिटिशांनी गादीवर बसवले. वास्तविक ते १८४४ च्या बंडात सामील झाल्याने त्यांचे गादीवरचे हक्क कमी केले होते; परंतु ब्रिटिशांनी मेहरनजर करून ठराविक नजराणा घेऊन त्यांना गादीवर बसवले. ब्रिटिशांनी कारभार हातात घेताना राजघराण्यात कर्ता पुरुष निर्माण होईपर्यंत कारभार पाहणार असे म्हटले होते. आनासाहेबांना पूर्णवेळ अधिकार देण्याचा विचार सुरू झाला; मात्र काही दिवसातच ते आजारी पडले. त्यामुळे हा विचार मागे पडला. शेवटी आजार वाढवून ७ मार्च १८६९ ला त्यांचे निधन झाले. यावेळी ते ४१ वर्षांचे होते. त्यांची राजकारकिर्द फारच अल्प ठरली. सुभानराव शिंदे सेनाखासकील तोरगलकर यांची कन्या असलेल्या ताराबाई या आनासाहेबांच्या पत्नी होत्या. त्यांच्यापासून त्यांना रघुनाथ सावंत ऊर्फ बाबासाहेब हे एकच पुत्ररत्न होते. आनासाहेब हे उदार, मनमिळावू आणि संस्थानामध्ये अतिशय लोकप्रिय होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com