किल्ले संवर्धनाबाबत संभाजी राजेंची तळमळ, कोकणाबाबत म्हणाले...

संतोष कुळकर्णी
Sunday, 9 August 2020

किल्याच्या डागडुजीचे अंदाजपत्रक बनवून पावसाळ्यानंतर कामाला सुरूवात होण्याच्या हालचालीबाबत संबधितांकडून आश्‍वासित केल्याचे खासदार संभाजी राजे यांनी विजयदुर्ग येथे सांगितले.

देवगड (सिंधुदुर्ग) - किल्ले संवर्धन आणि त्यांचे जतन होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गासह कोकणातील जलदुर्गांचे प्राधिकरण होण्याची आवश्‍यकता आहे. विजयदुर्ग किल्याची पडझड झाल्याचे वृत्त कानी येताच तातडीने दिल्ली गाठून पुरातत्व विभागासह सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. किल्याच्या डागडुजीचे अंदाजपत्रक बनवून पावसाळ्यानंतर कामाला सुरूवात होण्याच्या हालचालीबाबत संबधितांकडून आश्‍वासित केल्याचे खासदार संभाजी राजे यांनी विजयदुर्ग येथे सांगितले.

वाचा - 'ही' शिवेसनेची जुनी खोड ; निलेश राणेंची टीका

स्वराज्याचा ठेवा आणि किल्यांचे सौंदर्य जपले नाही तर शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष कामाचा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गच्या चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याच्या संरक्षक भिंतीच्या ढासळलेल्या भागाची आज खासदार संभाजी राजे यांनी पहाणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किल्ले संवर्धनाबाबत तळमळ व्यक्‍त केली.

यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, सभापती सुनील पारकर, सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, दामाजी पाटील, यशपाल जैतापकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. किल्याच्या ढासळलेल्या भागाची खासदार संभाजी राजे यांनी पाहणी करण्याबरोबरच संपूर्ण किल्याच्या तटबंदीवरून फिरून किल्याची बारकाईने पाहणी केली.

हेही वाचा - नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्....

भविष्यात किल्याच्या संवर्धनासाठी अपेक्षित बाबींवर त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवरांयाची स्मारक जीवंत ठेवायची असतील तर अभ्यासपूर्ण किल्ला पाहिला पाहिजे. विजयदुर्ग किल्याचे जतन होण्यासाठी मास्टर प्लान गरजेचा आहे. किल्ले विजयदुर्ग महोत्सवानिमित्त किल्यावर येणे झाले होते. किल्ले विजयदुर्गची पडझडीनंतर आपण दिल्ली गाठून पुरातत्व विभागासह संबधित मंत्र्यांची भेट घेतली. याबाबत तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किल्याच्या सध्याच्या पडझडीबरोबरच किल्याच्या एकूणच डागडुजीसाठी आपले प्रयत्न राहातील.

हेही वाचा - रत्नागिरीतील हा तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

सी सर्कीट टुरिझमसाठी प्रयत्न 
समुद्रातील किल्यांचे सौंदर्य जगात कोठेही पहावयास मिळत नाही. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारच्या किल्यांच्या अनुषंगाने "सी सर्कीट टुरिझम' वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje inspects Vijaydurg fort konkan sindhudurg