
पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकाराने येथे एकच खळबळ उडाली आहे.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळचे तहसीलदार अमोल फाटक व महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आंदुर्ले खिंड येथे हा प्रकार घडला. या संदर्भात तहसीलदार फाटक यांनी निवती (ता. वेंगुर्ले) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकाराने येथे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक होते की नाही, हे पाहण्यासाठी कुडाळ तहसीलदारांसह पथक बाहेर पडले होते. तहसीलदार फाटक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अवैद्य खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसोबत आंदुर्ले खिंड येथे गस्त सुरू होती. मध्यरात्री एक पांढरी मोटार तेथे आली. त्यातून चार व्यक्ती उतरले व हल्ला करण्याच्या उद्देशाने फाटक व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. त्यांनी ‘वाळु वाहतूक रोखाल तर याद राखा,’ अशी धमकी दिली.
हेही वाचा - कुडाळ बसस्थानकात क्रिकेट खेळो आंदोलन
मोटारीत वाळू व्यावसायिक होता व त्याच्याच मालकीची गाडी होती, असे समजते. तहसीलदार फाटक कुडाळ पोलिस ठाण्याच्या दिशेने येत असताना पुन्हा संशयितांनी मोटारीने पाठलाग केला. गाडी कुडाळ पोलिस ठाणे परिसरात नेली असता ते निघून गेले. या प्रकरणी चौघांवर निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले तपास करीत आहेत. संशयितांना ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती हुलावले यांनी दिली.
संपादन - स्नेहल कदम