रोह्यातील अंगणी दरवळला चंदनाचा गंध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रोहा - शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका म्हणून रोह्याची ओळख आहे. या तालुक्‍यात आता चंदनाचा गंध दरवळला आहे. प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी चंदनाच्या २०० झाडांची लागवड केली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात येतील शेतीची समीकरणे बदलणार आहेत. 

रोहा - शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका म्हणून रोह्याची ओळख आहे. या तालुक्‍यात आता चंदनाचा गंध दरवळला आहे. प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी चंदनाच्या २०० झाडांची लागवड केली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात येतील शेतीची समीकरणे बदलणार आहेत. 

चंदन हे जंगली वनस्पती प्रकारातील आहे. वरकस किंवा डोंगराळ भागात ते जोमाने वाढते. औषधी आणि सुगंध उद्योगात त्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे व्यवस्थित मोठी झाल्यास एक झाड १०० ते २०० किलो चंदन लाकूड देऊ शकते. चंदन लाकडाचा सध्याचा भाव २ हजार रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार सुमारे १० ते १२ वर्षांचे झाड २ ते ४ लाख रुपये कमीत कमी उत्पन्न देऊ शकते. २०० झाडांपैकी निम्मी झाडे जरी मोठी झाली, तरी अर्ध्या एकरात कमीत कमी २ ते ४ कोटी रुपयांचे उत्पन्न निघू शकते, असे मगर यांनी सांगितले.

रोहा तालुक्‍यातील चंदनशेतीचा हा पहिला प्रयोग असला, तरी तो खात्रीने यशस्वी होईल. इथली माती, हवामान चंदनशेतीसाठी योग्य आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भविष्यात अनेक शेतकरी या शेतीकडे वळतील. चंदनाला मागणी आणि भाव चांगला मिळत आहे.
- महादेव कीर, 

कृषी अधिकारी, रोहा 

आंतरपिकाद्वारेही उत्पन्न घेणार 
चंदनाचे झाड मोठे होण्यास किमान १० ते १२ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र शेतकऱ्याला प्रतिवर्षी उत्पन्न हवे असते. त्यामुळे या शेतात आंतरपीक घेणार असल्याचेही अनंत मगर यांनी सांगितले. अंतरपिकात सुरुवातीला तूर, भुईमूग आदी पिके; तसेच सीताफळासारखे फळपीक घेऊन शेतीचे उत्पादन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चोरांचे भय 
अनंत मगर यांनी दापोली कृषी विद्यापीठ येथून २०० चंदनाची झाडे आणून अर्ध्या एकरवर लागवड केली. त्यासाठी त्यांना सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च आला. चंदनाच्या झाडाचा देखरेख खर्च अधिक नसला तरी चोरांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे ते सांगतात. त्यासाठी शेतावर सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

असा होतो चंदनाचा उपयोग 
सफेद चंदन आणि लाल चंदन असे दोन प्रकार असतात. सफेद चंदन सुगंधी असते. त्याचा उपयोग आयुर्वेदिक औषध, सुगंधी साबण, तेल, सौंदर्य प्रसाधने, अत्तर, अगरबत्ती आणि धार्मिक कार्यात करण्यात येतो. लाल चंदन सुगंधी नसते; मात्र लाल रंगामुळे याचा वापर नैसर्गिक रंग तयार करणे, औषधे आणि महागडे फर्निचर तयार करण्यासाठी होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandal tree plantation in Roha