रक्‍तचंदनाचा 35 लाखांचा साठा गोवळकोटमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

चिपळूण - शहरातील गोवळकोट येथे वन विभागाने छापा टाकून सुमारे 35 लाखांचा रक्तचंदन साठा जप्त केला. या प्रकरणातील संशयित ईसा हळदे फरार झाला असून, वन विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.

चिपळूण - शहरातील गोवळकोट येथे वन विभागाने छापा टाकून सुमारे 35 लाखांचा रक्तचंदन साठा जप्त केला. या प्रकरणातील संशयित ईसा हळदे फरार झाला असून, वन विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.

परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांनी माहिती दिली, की त्यांना सकाळी एका खबऱ्याकडून गोवळकोट येथे रक्तचंदनाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करत कारवाईची व्यूहरचना तयार करण्यात आली. त्यानुसार गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्कच्या अल्‌-मदीना अपार्टमेंटमधील एका गाळ्यात साठा मिळाला. समीर शौकत दाभोळकर यांच्या मालकीचा हा गाळा आहे; मात्र दाभोळकर यांनी ईसा हळदे यांना तो भाडेतत्त्वावर दिला आहे.

अधिकाऱ्यांनी हळदेशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने प्रतिसाद दिला नसून, तो फरार झाला.

दरम्यान, दाभोळकर यांच्याशी चर्चा करून गाळ्याचे कुलूप काढा, अन्यथा आम्ही ते तोडू, असा इशारा वन विभागाने दिला. त्यानंतर दाभोळकर यांनी स्वतः कुलूप तोडले. गाळ्यात रक्तचंदनाचे 92 लाकडांचे नग आढळून आले. सुमारे तीन टन वजनाचा हा साठा आहे. मुंबई, पुणे बाजारपेठेतील रक्तचंदनाचा प्रचलित दर एक ते दीड हजार रुपये प्रतिकिलो आहे. त्यानुसार या साठ्याची किंमत 35 लाख आहे.

रक्‍तचंदनाचा एक नमुना तज्ज्ञांकडे पाठवून त्याची निश्‍चित किंमत ठरवली जाणार आहे.

Web Title: sandle wood seized