संगमेश्‍वरमध्ये लाल रंगाची उधळण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

देवरूख - ग्रामदेवतेच्या नावाचा जयघोष करीत लाल रंगाची मनसोक्‍त उधळण करीत आज संगमेश्‍वरच्या श्री देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव रविवारी उत्साहात पार पडला. कोकणातील हजारो भाविक या उत्सवासाठी संगमेश्‍वरात दाखल झाले होते. उत्सव शांततेत झाला. 

देवरूख - ग्रामदेवतेच्या नावाचा जयघोष करीत लाल रंगाची मनसोक्‍त उधळण करीत आज संगमेश्‍वरच्या श्री देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव रविवारी उत्साहात पार पडला. कोकणातील हजारो भाविक या उत्सवासाठी संगमेश्‍वरात दाखल झाले होते. उत्सव शांततेत झाला. 

कसबा संगमेश्‍वर येथील आगळ्यावेगळ्या शिंपणे उत्सवाला सकाळी ६ वाजल्यापासूनच सुरवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्‍वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्‍तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. माहेरवाशिणी व अन्य महिला देवीची खणा-नाराळाने ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल झाल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्यांचा समावेश होता. रात्री उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रितीने मटण-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. 

प्रत्येक घरात काजूगर घातलेले मटण, वडे व भाकरी असा फक्‍कड बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. महिलांचाही समावेश मोठा होता. एकमेकांना रंगविण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते.

या उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री तर दिव्यांच्या माळांनी सजलेली ही मंदिरे वातावरणातील भक्तिभाव वाढवत होती. रात्री १० च्या दरम्यान कसबा व संगमेश्‍वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली.

Web Title: sangmeshwar yatra

टॅग्स