नागरिकांनो घाबरू नका, संजय गांधी राष्ट्रीय उदयान पथक झाले रत्नागिरीत दाखल

राजेश शेळके
Monday, 7 September 2020

बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मकदृष्टीने हा हल्ला केला असावा, असा अंदाज आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी-जांभूळआड येथे शेतकर्‍यावर हल्ला करणार्‍या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला पिंजर्‍यामध्ये जेरबंद करण्यासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयान येथील बचाव पथक काल रत्नागिरीत दाखल झाले आहे. अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मक दृष्टीने हा हल्ला केला, असावा अशी शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.

हेही वाचा - कोकणकरांनो सावधान ; अन्यथा तुमची दुकाने सील 

मेर्वी जांभूळआड येथील जनार्दन काशिनाथ चंदुरकर यांच्यावर शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याबाबत मेर्वी येथील पोलिस पाटील यांनी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने तत्काळ रुग्णवाहिकेची सोय करून जखमी चंदुरकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वन अधिकार्‍यांनी  जखमी चंदुरकर यांची हॉस्पीटमध्ये जाऊन विचारपूस केली. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून बिबट्याने हल्ला केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली.

हल्ला करणारा बिबट्या दोन लहान बछड्यांसोबत होता. ते ठिकाण हे बेहेरे यांच्या आंबा बागेतील आहे. या बागेतून आपण गुरे चरायला सोडून घरी परतत होतो. तेव्हा हा हल्ला झाल्याचे जखमी चंदुरकर यांनी सांगितले. बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मकदृष्टीने हा हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी या भागात वन विभागामार्फत पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच या परिसरामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला पिंजर्‍यामध्ये जेरबंद करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उदयान (बोरिवली) येथील बचाव पथक रत्नागिरीत  दाखल झाले आहे. नागरिकांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी वन विभागाने तत्परता दाखविली आहे.

हेही वाचा - कोकणातला मासा सातासमु्द्रापार ; इतक्या कोटीची रोज होतेय उलाढाल

आवश्यकता असेल तरच बाहेर पडा

नागरिकांना सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर तसेच शेतामध्ये जाऊ नये. रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक असले शक्यतो फिरताना हातात काठी तसेच बॅटरी घेऊन बाहेर पडावे. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करणे तसेच मागोवा काढत फिरणे हया बाबी प्रकर्षाने टाळाव्यात. परिसरामध्ये मनुष्य, पाळीव प्राण्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास तत्काळ वनविभागास कळविण्यात यावे, असे आवाहन रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी केले आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Gandhi National Park Squad has entered in Ratnagiri to locked a leapord