'आमदार कदमांची हक्कभंग नोटीस म्हणजे स्टंटबाजी'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे.

दाभोळ (रत्नागिरी) : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का, असा सवाल माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे.

हेही वाचा - बांद्यातील महास्वच्छतादूत बहुमान मिळवणारी दुर्गा -

दापोली मतदारसंघात ग्रामपंचायत सदस्यही नसताना आमदार कदम भूमिपूजन करत होते. वडील मंत्री असल्याने अनेक शासकीय भूमिपूजन फलकावर त्यांचे नाव टाकण्यात आले होते. हा हक्कभंग होत नाही का, असा थेट सवाल माजी आमदार संजय कदम यांनी करून योगश कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार कदम यांनी तटकरेंच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे २० ऑक्‍टोबरला हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्याबाबत संजय कदम यांनी भूमिका स्पष्ट केली.

आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून मोठी चूक केली आहे. यापूर्वी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री दापोली मतदारसंघांमध्ये नाक खुपसत होते, तेव्हा हक्कभंग होत नव्हता का? जनतेची दिशाभूल करणे योगेश कदम यांनी थांबवावे. राज्यामध्ये आघाडीचे सरकार गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु स्थानिक पातळीवर जुळवून घेण्याऐवजी कुरघोडी करण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा - सावधान ! तिलारीच्या कालव्यात वाढतोय मगरींचा मुक्काम -

आमदार योगेश कदम यांनी केवळ एकच पावसाळा बघितला आहे. आताच ते हक्कभंगाची भाषा करू लागले आहेत. खासदार तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली तर बिघडले कुठे. त्यांनी मतदारसंघात विकासकामे करायची नाहीत का. आंबेत म्हाप्रळ पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव आपल्या कारकिर्दीत पाठविण्यात आला होता. याचा पाठपुरावाही केला होता. गेली पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार या नात्याने स्थानिक आमदारांना डावलले जात होते, तेव्हा प्रोटोकॉल कुठे होता, असा सवालही संजय कदम यांनी केला आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay kadam criticized on ramdas kadam on the topic of yogesh kadam question in ratnagiri