संजू परब यांनी माफी मागावी अन्यथा आगामी निवडणुकीत योग्‍य ती भूमिका घेऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजू परब यांनी माफी मागावी अन्यथा आगामी निवडणुकीत योग्‍य ती भूमिका घेऊ

संजू परब यांनी माफी मागावी अन्यथा आगामी निवडणुकीत योग्‍य ती भूमिका घेऊ

सिंधुदुर्ग (कणकवली) : सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर काल (ता.२४) टीका केली. यावेळी त्‍यांनी तेली जातीचा तुच्छता पूर्वक उल्‍लेख केला. त्‍याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्‍हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली आणि खजिनदार परशूराम झगडे यांनी केली. त्‍यांनी माफी न मागितल्‍यास आगामी निवडणुकीत आमचा समाज योग्‍य ती भूमिका घेईल, असा इशाराही देण्यात आला.

येथील तेली समाज उन्नती मंडळाच्या कार्यालयात लक्ष्मण तेली, परशुराम झगडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत आबा तेली, प्रकाश काळसेकर, विशाल नेरकर, दया हिंदळेकर, साई आंबेरकर आदी उपस्थित होते.

लक्ष्मण तेली म्‍हणाले, "राजकीय पक्षांनी आणि त्‍यांच्या नेतेमंडळींनी राजकीय टीकाटीपणी जरूर करावी; पण त्‍यात आमच्याच नव्हे तर कुठल्‍याही समाजाला वेठीस धरण्याचे काम करू नये. तेली समाजाच्या अनुषंगाने सावंतवाडी नगराध्यक्षांचे विधान चुकीचे आहे. त्‍यांनी आमच्या समाजाचा अपमान केलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांची आपल्‍या विधानाबद्दल माफी मागायला हवी."

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

परशुराम झगडे म्‍हणाले, "निवडणुका आल्‍या तुम्‍ही राजकीय पक्षाची मंडळी दारोदार फिरता. प्रत्‍येक जातीचे किंबहुना सगळ्या समाजाचे लोक तुम्‍हाला हवे असतात; पण निवडणूक जिंकल्‍यानंतर तुम्‍ही सगळ्या जाती विसरता आणि फक्‍त तुम्हाला तुमचीच जात लक्षात राहते; मात्र पुढील काळातही निवडणूका येणार आहेत. त्‍यावेळी आम्‍ही जिल्‍ह्‍यातील सर्व तेली समाज एकत्रित बसून याबाबतचा निर्णय घेणार आहोत." तेली उन्नती मंडळाचे सचिव चंद्रकांत तेली म्हणाले, "गंगू तेली ही व्यक्ती इतिहासात नव्हती. राजा गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे मिळून भोज राजाशी लढले. त्याची तुलना करताना अपभ्रंश झाला. ते गद्दार नव्हते. त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना दुखावू नयेत." यावेळी शैलेंद्र डिचोलकर यांनीही संजू परब यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला.

loading image
go to top