तेली हा कॉंग्रेससाठी संपलेला विषय- संजू परब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

परब म्हणाले, "जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कॉंग्रेसला जड जातील, असा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. लोकांचा कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्यावर विश्‍वास आहे. त्यामुळे या निवडणुकांत तालुक्‍यातील नऊ जिल्हा परिषद मतदार संघांसह पंचायत समितीवर आमचीच सत्ता राहील.''

सावंतवाडी - "राजन तेली हा कॉंग्रेस पक्षासाठी संपलेला विषय आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकानंतर येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे पार्सल कणकवलीला पाठवून देतील. त्यांना आमदार नीतेश राणेंवर टीका करण्याचा अधिकार नाही,' अशी टीका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेली मंडळी टवाळखोर आहेत. त्यांच्या जाण्यामुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघ कॉंग्रेसच्याच ताब्यात राहणार, असा दावा श्री. परब यांनी केला. आज येथील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी रवींद्र म्हापसेकर उपस्थित होते.

परब म्हणाले, ""जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कॉंग्रेसला जड जातील, असा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. लोकांचा कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्यावर विश्‍वास आहे. त्यामुळे या निवडणुकांत तालुक्‍यातील नऊ जिल्हा परिषद मतदार संघांसह पंचायत समितीवर आमचीच सत्ता राहील.''

परब पुुढे म्हणाले, ""कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेला फायदा होणार आहे, अशी अफवा काही लोकांकडून उठविली जात आहे. काहीही झाले तरी कोलगाव हा कॉंग्रेसचा बालेकिल्लाच राहणार आहे. त्या ठिकाणी झालेली विकासकामे ही कॉंग्रेस नेते श्री. राणे यांनी आणलेल्या निधीतून झाली आहेत. त्यामुळे ती कामे आपण केली असा कोणी दावा केला तर ते योग्य ठरणार नाही. त्या ठिकाणी काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत, गावात त्यांना टवाळखोर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जाण्यामुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता ते नसल्यामुळे संघटना जोमाने वाढेल. कोलगाव जिल्हा परिषदेची जबाबदारी माजी उपसभापती बाबल अल्मेडा यांना देण्यात आली आहे. ते त्या ठिकाणचे खंदे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांना निरीक्षक म्हणून निवडण्यात आले.''

Web Title: sanju parab talked about congress leader rajan teli