सर्जेकोट पाणी प्रश्‍न "जैसे थे' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मालवण - कांदळगाव येथून सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा करण्याच्या विषयावर आज झालेल्या विशेष सभेत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी कांदळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेत सर्जेकोट-मिर्याबांदावासीयांना केवळ पिण्यासाठी काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली. यावर कांदळगावचे सरपंच बाबू राणे यांनी याप्रश्‍नी ग्रामसभा घेतली जाईल. यात ग्रामस्थांनी सांगितले तरच सर्जेकोट-मिर्याबांदावासीयांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे पाणीप्रश्‍नी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. 

मालवण - कांदळगाव येथून सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा करण्याच्या विषयावर आज झालेल्या विशेष सभेत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी कांदळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेत सर्जेकोट-मिर्याबांदावासीयांना केवळ पिण्यासाठी काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली. यावर कांदळगावचे सरपंच बाबू राणे यांनी याप्रश्‍नी ग्रामसभा घेतली जाईल. यात ग्रामस्थांनी सांगितले तरच सर्जेकोट-मिर्याबांदावासीयांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे पाणीप्रश्‍नी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. 

कांदळगाव गावातून सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा करण्यास कांदळगाववासीयांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य तोडगा काढून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पंचायत समिती प्रशासनातर्फे आज पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात विशेष सभा घेतली. सभेस सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे, नायब तहसीलदार एस. एल. गोसावी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव वाळके, के. टी. पाताडे, सर्जेकोट-मिर्याबांदा ग्रामपंचायतीचे सरपंच दाजी कोळंबकर, कांदळगावचे सरपंच बाबू राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर कांदळकर, जी. जी. आडकर, साक्षी निकम, एम. एम. कांबळी, उपसरपंच सविदा खवणेकर, पोलिसपाटील शीतल परब, केसरीनाथ मायबा, ग्रामसेवक बी. आर. मेस्त्री, ए. बी. पेठे, ग्रामपंचायत सदस्य सुशांत सुर्वे, भाग्यश्री डिचवलकर, वैभवी राणे, राजेंद्र कोदे, विकास आचरेकर, गीतेश कोदे आदी उपस्थित होते. 

सर्जेकोट-मिर्याबांदाचे सरपंच दाजी कोळंबकर यांनी सर्जेकोट गावास सध्या क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. कोरे महान येथील नळपाणी योजनेवरून आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे; मात्र तो फारच कमी आहे. भारत निर्माण योजनेतून 2007-08 मध्ये कांदळगाव येथून सर्जेकोट-मिर्याबांदा गावासाठी पाणीपुरवठा करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र गेली दहा वर्षे हे काम बंद आहे. कांदळगाव येथे योजनेसाठी 23 लाख रुपये खर्च करून विहीर खोदण्यात आली आहे. ही नळपाणी योजना व्हावी, यासाठी काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीकडून जे प्रयत्न होणे आवश्‍यक होते, ते झाले नाहीत; मात्र आता गावात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने कांदळगाव येथून गावास पाणीपुरवठा होणे आवश्‍यक बनले आहे. काही दिवसांपूर्वी कांदळगाव येथील विहिरीतील पाण्याचा उपसा करून त्याचा परिसरातील विहिरींवर काही परिणाम होतो का? याची पाहणी करण्यास भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी गावात गेले. मात्र, कांदळगाववासीयांनी विरोध केल्याने पाहणी होऊ शकली नाही. त्यामुळे सर्जेकोट-मिर्याबांदावासीयांची पाण्याअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कांदळगाववासीयांनी एक दिवसाआड पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

कांदळगावचे सरपंच बाबू राणे यांनी कांदळगाव येथे नळपाणी योजनेसाठी ज्या जागेचे बक्षीसपत्र केले ते सर्व्हे क्रमांक 45 चे असून, प्रत्यक्षात विहिरीचे काम सर्व्हे क्रमांक 59 मध्ये करण्यात आले आहे. याबाबत केलेल्या मोजणीचा अहवाल त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला. बक्षीसपत्र करताना सर्जेकोट ग्रामपंचायतीने जी काळजी घेणे आवश्‍यक होती, ती घेतलेली नाही. बक्षीसपत्र करण्यापूर्वी सहहिस्सेदारांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही न झाल्याने हे बक्षीसपत्रच चुकीचे आहे. सद्यःस्थितीत गावात पाणीटंचाई भासत आहे. शेमाड राणेवाडी येथील नळपाणी योजनेवरून तीन दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणी मिळू नये, अशी आमची इच्छा नाही. मात्र, गावातील पाणीटंचाईचाही विचार होणे आवश्‍यक आहे. गावावर जर बळजबरी करून पाणी देण्याचा प्रयत्न होत असेल तर ते होऊ देणार नाही. बेकायदेशीररीत्या कोणतेही काम न करता अन्य पर्याय शोधण्यात यावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणी देण्याचा प्रश्‍न भांडण करून सुटणार नाही. त्यामुळे एकदिलाने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी यांचा सामंजस्याने विचार करणे आवश्‍यक आहे. कांदळगाववासीयांनी आम्हाला काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे. जर कांदळगावासच पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसल्यास तेथून पाणीपुरवठा बंद करावा, असे श्री. आडकर यांनी सांगितले. यावर विकास आचरेकर यांनी या पाणी प्रश्‍नासंदर्भात कांदळगाव येथेच बैठक घेण्यात यावी. गावात मुबलक प्रमाणात पाणी आहे का, याची पाहणी होणे आवश्‍यक आहे. गावातच जर पाण्याची कमतरता असेल तर सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणी द्यायचे कसे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

दोन्ही ग्रामपंचायतींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी सामंजस्याने पाणी प्रश्‍न सुटावा, यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. सर्जेकोट-मिर्याबांदा गावची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. त्यांना सध्या क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याच्या पुरवठ्यामुळे लहान मुलांबरोबर अन्य ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या गावास कोरे महान येथून काही प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. अन्य भागातून या गावास पाणीपुरवठा करता येईल का, यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. कांदळगाव येथे बांधण्यात आलेल्या विहिरीसाठी शासनाचे लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या विहिरीवरील पाणी पिण्यासाठी सर्जेकोट-मिर्याबांदा गावास उपलब्ध करून द्यावे. गावातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे जाणवल्यास तो पुरवठा बंद करावा, असे सांगितले. यावर कांदळगाव सरपंच राणे यांनी यासाठी ग्रामसभा घेऊन जर ग्रामस्थांनी सांगितले तरच गावास पाणीपुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

ग्रामस्थांना समजावण्याचे आवाहन 
सरपंचांनी ग्रामस्थांना वस्तुस्थिती पटवून दिल्यास हा पाणी प्रश्‍न सुटू शकतो, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी श्री. आचरेकर यांनी उपरचा व्हाळ येथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून, तेथून सर्जेकोट-मिर्याबांदा गावास अविरत पाणीपुरवठा केला जाऊ शकतो, असे निदर्शनास आणले. त्यानुसार या भागाचीही पाहणी केली जाईल. तोपर्यंत सद्यःस्थितीत कांदळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेत सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली. यावर ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी सांगितले तरच पाणीपुरवठा करू, असे सरपंच श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: sarjekot water issue