चौकुळात बाजार भरला आणि बहरलाही...

savantwadi chokul the market success in sindudurg kokan marathi news
savantwadi chokul the market success in sindudurg kokan marathi news

सावंतवाडी  (सिंधुदूर्ग ) : शहरापासून दूर तरीही स्वयंपूर्ण असलेल्या चौकुळने गावात आठवडा बाजार भरवला आणि यशस्वीही केला. रानभाज्या, सुकी मासळी ते कांद्या-बटाट्यापर्यंतच्या दुकानांनी सजलेला हा आठवडा बाजार आज सलग चौथ्या मंगळवारी चढत्या क्रमाने भरला. यातून लोकांची सोयही झाली. आणि घरगुती वस्तूंना मार्केटही मिळाले. अवघ्या 6-7 तासात तीन लाखाच्या वर उलाढालही पोहोचली.रोजगार आणि बाजार ही खरे तर सख्खी भावंडे.

गावात बाजार असला तर त्यातून हळूहळू सुविधा, रोजगार वाढत जातो ; मात्र बाजारपेठ ठरावीक शहरांची मक्तेदारी असते. त्याकडे आजुबाजूच्या गावांना यावे लागते. चौकुळ हे सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले खरे तर दुर्गम गाव. त्यांना बाजारपेठ गाठायची असेल तर 40 किलोमीटरचा फेरा मारत घाट उतरून सावंतवाडीत यावे लागते ; मात्र दुर्गमते बरोबरच प्रतिकुल परिस्थितीशी झगडण्याचे नैसर्गिक बळ ही या गावात आहे. यामुळे अनेक क्षेत्रात हे गाव स्वयंपूर्ण आहे. अलिकडेच रूजलेली ग्रामपर्यटन संकल्पना चौकुळला वेगळी ओळख देवून गेली आहे. 

आठवडा बाजार संकल्पना मांडली

येथे जवळपास बाजारपेठ नसल्याने भाजी व इतर गोष्टींसाठी सावंतवाडीवर अवलंबून राहावे लागत होते. लुपीन फाऊंडेशन या ग्रामीण विकासात काम करणार्‍या संस्थेने येथे पर्यटन विकासासाठी काम केले होते. येथे आठवडा बाजार संकल्पना चांगली रूजू शकते असे लुपीनचे मत होते. त्यांनी ही संकल्पना गावासमोर मांडली. एकजुटीसाठी प्रसिध्द असलेल्या चौकुळवासीयांनी ही डोक्यावर घेतली. दोन आठवड्यांच्या तयारीनंतर महिन्याभरापूर्वी प्रत्यक्षात बाजाराचे उद्घाटन झाले. लुपीनने बाजारासाठी लागणार्‍या मोठ्या छत्र्या उपलब्ध करुन दिल्या. गावठी बाजाराचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले. पण ते बर्‍याचदा उद्घाटनापूरते मर्यादीत राहिले. ही स्थिती लक्षात घेवून चौकुळमध्ये सर्वसमावेशक आठवडा बाजार संकल्पना मांडण्यात आली.

बाजाराचा प्रवास चढता ​

यात रानभाज्या, गावात मिळणार्‍या वस्तू याच्या जोडीनेच सुकी मासळी, कांदे-बटाटे, घाटमाथ्यावरील भाजी यालाही स्थान देण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनीच व्यापार्‍यांशी समन्वय साधला. यामुळे आज सलग चौथ्या आठवडा बाजारात गर्दी आणि उलाढाल चढत्या क्रमाने होती. याबाबत तेथील ग्रामस्थ तथा माजी सैनिक बापू गावडे म्हणाले, “ही संकल्पना यशस्वी झाली आहे. पूर्वी स्थानिकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी दूर जावे लागत असे. आता भाजीसह सर्व गोष्टी गावातच मिळू लागल्या आहेत. शिवाय स्थानिकही आपल्याकडील भाजी, मध व इतर वस्तू याची विक्री करू लागले आहे. येत्या काही दिवसात गावठी कांदे, स्थानिक लसून अशा चौकुळची ओळख असलेल्या वस्तूही बाजारात उपलब्ध होतील. आतापर्यंतचा या बाजाराचा प्रवास चढता राहिला आहे.”

ग्रामस्थांची एकी महत्त्वाची 
लुपीन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू म्हणाले, “अशा छोट्याछोट्या प्रयत्नातून गावातील पैसा गावातच खेळता राहू शकतो. यामुळे वस्तू खरेदीसाठी होणारा प्रवास आणि लागणारा वेळ वाचला आहे. स्थानिकांना आपल्या शेतातील भाज्या, इतर वस्तू, बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झाले आहे. भविष्यात येथे शासकीय योजनेतून मार्केट शेड उभारण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांनी दाखवलेली एकी येथे महत्त्वाचे आहे. 

कोल्हापूरची गावे जोडण्याचा प्रयत्न
चौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे म्हणाले, “आमच्या गावाच्या पलिकडे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या पारगड, इसापूर, तेरवण, नामखोल, वाघोत्री या गावांनाही जवळ बाजारपेठ नाही. त्यांनाही चौकुळच्या आठवडा बाजाराशी जोडणार आहोत. या गावांपर्यंत जाणारा रस्ता मध्यंतरी खराब झाला होता. तो आता दुरूस्त केला जात असून तेथून एसटी वाहतूक सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास या बाजाराची व्याप्ती वाढेल.”

बाजाराला देणार वेगळी ओळख
हा आठवडा बाजार सुरू करताना त्याची वाटचाल कशी असेल याचेही नियोजन झाले आहे. याठिकाणी अस्सल गावठी वस्तू उपलब्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात येथे सोरटी तांदूळ, आमसोल, गावठी लिंबू, सेंद्रिय नाचणी, लोणचे, गोमुत्र, गावठी अंडी, भरलेली मिर्ची, शेणखत, मक्याचीबोंडा, गावठी पेरु, मिरी, फाक्याची आमटान, आवळा सरबत अळंबी, चौकुळचे रानमध, देसी तुप, शिरंगाळ, बेडकीचा पाला, सावरबोंडी केळी, तवशी, तमालपत्र, कुंभवडा काजु, वेखंड, शिकेकाई, बेटीचे कोंब, मरगज, बाळ हरडा, रानजायफळ, सुरणकांदा,गावठी कोंबडी, रानभाज्या,

सुपारीबेडे, गावठी कांदे, फागला, आंब्याची तोरा, गावठी लसुण, शेगलाची शेंग, फणस, कोकम सरबत, कुर्ले, माडाळी, कोकम आगळ, गरम मसाला, आंबा,हळद, कुळीथपिठी, सांडगे, कढीपत्ता, अळू, शेणी, केळीचा बॉण्ड  नाचणी पिठ, गावठी नारळ, नाचणी पापड, चढणीचे मासे अशा या भागातच मिळणार्‍या वस्तूंचे दालन असणार आहेत. यातील बर्‍याच वस्तू हंगामी आहेत. यातील काही आताही मिळू लागल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com