'सावित्री'च्या जखमा ताज्याच...

प्रकाश पाटील
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कांबळे कुटुंबाला मदतीसाठी सरकारची टोलवाटोलवी

कांबळे कुटुंबाला मदतीसाठी सरकारची टोलवाटोलवी
सावर्डे - सावित्री दुर्घटनेत येथील एसटी चालक श्रीकांत कांबळे आणि महेंद्र कांबळे या पिता-पुत्राचा अंत झाला. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्याच्या जखमा ओल्या आहेत. बसचालक कांबळे यांची पत्नी कमल व मुलगा मीलन अद्यापही या धक्‍क्‍यातून बाहेर पडले नाहीत. त्यांना मदत देताना झालेली चालढकल तर जखमांवर मीठ चोळणारी आहे.

'दोन मुलांसह चौकोनी कुटुंबाचा संसार गुण्यागोविंदाने चालला होता. पहिला मुलगा मीलन बी. ई. मेकॅनिकल पदवीधर, दुसरा महेंद्र देखील अतिशय हुशार. त्यालाही अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता. प्रवेशासाठी वडिलांबरोबर मुंबईला जाताना दोघांवर काळाने झडप घातली. आकाश कोसळले. जगण्यातही राम नव्हता; पण आता मोठ्या मुलासाठी जगायचे तोच सर्वस्व,'' हे सांगताना कमल यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

घरची गरिबीच. 300 चौरस फुटांचे घर, मुलांना मोठे करण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न उद्‌ध्वस्त झाले. पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर वारसाला दहा लाखांची मदत किंवा नोकरी असे सरकारने आश्‍वासन दिले होते. महेंद्रच्या मृत्यूनंतर मदत मिळाली; मात्र पतीच्या मृत्यूमुळे मोठ्या मुलाला सरकारने नोकरी देण्याचे कबूल केले. ते आश्‍वासन अजून हवेतच आहे. मुलगा मीलनला एसटी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. सरकारकडे सावित्री पूल सहा महिन्यांत बांधायला पैसे आहेत; मात्र मृतांच्या नातेवाइकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करता येत नाही.

दुर्घटनेनंतर मुलाचा मृतदेह वाहून आणणाऱ्या शववाहिकेचा खर्चही मदतीतून वजा करून घेण्यात आला. माझे सौभाग्य नेताना "सावित्री' एवढी कठोर का झाली,'' हा त्यांचा आर्तसवाल काळीज पिळवटून टाकणारा आहे.

सरकार कधी जागे होणार?
अपघातात वडील आणि भाऊ गेले. मी बी.ई. मेकॅनिकल अभियंता आहे. माझ्या पात्रतेला साजेशा नोकऱ्या परिवहन महामंडळात आहेत; पण महामंडळ टोलवाटोलवी करीत आहे. यादी लागली आहे. क्रमांक येईल तेव्हा तुम्हाला घेतले जाईल, असे सांगितले जाते. मायबाप सरकार कधी जागे होणार, असा उद्विग्न सवाल मीलन कांबळे याने विचारला.

सरकारी असंवेदनशीलता
* इंजिनिअर मुलाला नोकरी नाही
* एसटीचे उंबरे झिजवतोय
* उद्‌ध्वस्त स्वप्न घेऊनच जगणे
* शववाहिनीचा खर्चही मदतीच्या रकमेतून कापून घेतला

Web Title: savarde konkan news savitri river bridge colapse